Aurangabad : लसीकरण वाढीसाठी आता अधिकारी तालुका मुक्कामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

लसीकरण वाढीसाठी आता अधिकारी तालुका मुक्कामी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाची टक्केवारी पाहता पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री यांना चिंता व्यक्त केली आहे. यामुळे लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह, जिल्हा परिषदेने देखील आता मोठ्या प्रमाणावर पावले उचलली असून जिल्हा परिषदेने पुढाकार घेत लसीकरणाचा टक्‍का वाढीसाठी विविध मोहीम राबविण्यात येत आहे. यात प्रत्येक तालुक्याला एक नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात आली असून सोमवारी (ता.१५) मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी कन्नडला तर नोडल ऑफिसरांनी जनजागृतीसाठी तालुक्याला मुक्काम केला.

जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिल्या डोसचे प्रमाण ५७ टक्क्यांवर पोचले आहे. ही टक्केवारी इतर जिल्ह्यांच्या प्रमाणात समाधानकारक नसल्यामुळे लसीकरण वाढण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध मोहीम हाती घेतल्या आहेत. यात लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन रोखण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी सांगितले. दरम्यान लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन गटणे यांनी केले. तसेच डिसेंबरच्या शेवटीपर्यंत जिल्ह्यात ९० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी सर्व तालुक्यात नोडल ऑफिसर यांची नेमणूक केली आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, पैठण- उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभागाचे सुदर्शन तुपे, खुलताबाद-शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, गंगापूर- शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, वैजापूर- कृषी अधिकारी आर.पी. देशमुख, कन्नड- पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, सिल्लोड- समाज कल्याण अधिकारी शिवराज केंद्रे, फुलंब्री- महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, सोयगाव पशुधन विकास अधिकारी डॉ. रत्नाकर पेडगावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

loading image
go to top