घाण्याचे की रिफाइंड? तेलापेक्षा ‘प्रमाण’ महत्त्वाचे

घाण्याचे की रिफाइंड? तेलापेक्षा ‘प्रमाण’ महत्त्वाचे
Published on
घाण्याचे की रिफाइंड यापेक्षा तेलाचे ‘प्रमाण’ महत्त्वाचे --- हेल्दी ऑइलच्या नावाखाली अतिरेक नको, आजारानुसार घ्या तज्ज्ञांचा सल्ला --- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : पोळी-भाजी असो, वरणाला फोडणी असो किंवा एखादा कुरकुरीत तळलेला पदार्थ... आपल्या स्वयंपाकघरात तेलाचा वापर रोजच होतो. पण, घाण्याचे तेल चांगले की रिफाइंडचे? कोल्ड प्रेस घ्यावे की साधे? दिवसाला किती तेल वापरावे? असे प्रश्न अनेकांना पडतात. वजन कमी करण्यासाठी काही जण तेल पूर्णपणे बंद करतात, तर काही जण ‘हेल्दी ऑइल’ म्हणून गरजेपेक्षा जास्त वापरतात. मात्र, आहार तज्ज्ञांच्या मते तेलाच्या प्रकाराइतकेच ते किती व कशा पद्धतीने वापरले जाते, हेही महत्त्वाचे आहे. तेल पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते; शरीराला आवश्यक असणारी चरबी आहारातून मिळणे गरजेचे असते. मात्र, तेलातून मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळत असल्याने अतिसेवनाने वजन वाढण्याचा धोका असतो. तेलाच्या बाटलीवर ‘कोलेस्टेरॉल फ्री’ लिहिलेले पाहून अनेकांना ते आरोग्यासाठी चांगले वाटते. पण, वनस्पती तेलांमध्ये मुळातच कोलेस्टेरॉल नसते. त्यामुळे केवळ हा शब्द पाहून निर्णय घेऊ नये; तेलातील चरबीचा प्रकार आणि तिचे प्रमाण पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते. रिफाइंड तेलावर प्रक्रिया होत असल्याने ते जास्त काळ टिकते. मात्र, ‘रिफाइंड वाईट आणि घाण्याचेच सर्वोत्तम’ असा सरळ नियम नाही. तेल कोणत्या बियांपासून बनले आहे, हेही पाहावे लागते. वेगवेगळ्या तेलांमध्ये चरबीचे प्रकार वेगवेगळे असतात. त्यामुळे आहारात शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, मोहरी किंवा ऑलिव्ह यांसारखे तेल गरजेनुसार बदलून वापरावे. यामुळे विविध प्रकारची आवश्यक चरबी मिळते. मात्र, तेल बदलले तरी ते जास्त वापरण्याची मुभा मिळत नाही, हे लक्षात ठेवावे, असेही आहार तज्ज्ञांनी सांगितले. --- ((((कोट))) ABD26J78583 घाण्याचे, कोल्ड प्रेस किंवा रिफाइंड यापैकी कोणते तेल वापरावे, यापेक्षा दिवसातून एकूण किती तेल आहारातून घेतले जाते, हे आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. तेल पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र, गरजेपेक्षा जास्त तेल सेवन केल्यास अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वाढणे, लठ्ठपणा आणि त्यातून विविध आजारांचा धोका वाढू शकतो. मधुमेह, हृदयविकार किंवा लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी तेलासोबत तळलेले पदार्थ, फास्ट फूड आणि इतर स्निग्ध पदार्थांचेही प्रमाण नियंत्रित ठेवावे. आजाराची स्थिती आणि व्यक्तीच्या आहारानुसार तेलाचे प्रमाण ठरविण्यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. - डॉ. प्रियांका मंगरूळे, जनरल फिजिशियन -- भजी, पुरी किंवा वडे तळल्यानंतर उरलेले तेल वारंवार गरम करून वापरणे टाळावे. यामुळे तेलामध्ये अपायकारक बदल होऊ शकतात. तळण्यासाठी जेवढे लागेल तेवढेच तेल घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. तरीही तेल उरल्यास ते शक्य तितक्या लवकर वापरावे. त्याचा वास, रंग किंवा चव बदलल्यास ते अजिबात वापरू नये. - अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ -- मधुमेह किंवा हृदयविकार असणाऱ्यांनी स्वतःहून तेलाची निवड करण्यापेक्षा एकूण आहारातील तेल, तळलेले व स्निग्ध पदार्थ तपासून घ्यावेत. ज्येष्ठांनी तेल पूर्ण बंद न करता आरोग्यस्थितीनुसार डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. केवळ नॅचरल, कोल्ड प्रेस, लाइट किंवा कोलेस्टेरॉल फ्री असे शब्द न पाहता बाटलीवरील सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, इतर घटक व वापरण्याची अंतिम तारीख तपासावी. - रसिका देशमुख, आहारतज्ज्ञ --- अशी घ्या काळजी -तेल पूर्णपणे बंद न करता योग्य प्रमाणात वापरावे. -तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नये; तळण्यासाठी गरजेपुरतेच तेल घ्यावे. -‘कोलेस्टेरॉल फ्री’ किंवा ‘हेल्दी’ अशा जाहिरातींवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. -खरेदी करताना सॅच्युरेटेड व ट्रान्स फॅटचे प्रमाण आवर्जून तपासावे. -मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा आणि ज्येष्ठांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने तेलाचे प्रमाण ठरवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com