आता जातपडताळणी पूर्णपणे ऑनलाइन, घरबसल्या मिळणार प्रमाणपत्र

आता जातपडताळणी पूर्णपणे ऑनलाइन, घरबसल्या मिळणार प्रमाणपत्र
Published on: 
जातपडताळणी पेपरलेस; सुनावणीही ऑनलाइन टीसीएसच्या माध्यमातून अद्ययावत प्रणाली; सुनावणीसाठी तीन तारखांचे पर्याय ----- जळकोट, ता. १८ (बातमीदार) : जातप्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) माध्यमातून अद्ययावत ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे जातपडताळणीची प्रक्रिया पेपरलेस झाली असून, अर्जदारांना कागदपत्रांच्या छायांकित प्रती किंवा हार्डकॉपी समिती कार्यालयात जमा करण्यासाठी जाण्याची आवश्यकता राहणार नाही. नव्या प्रणालीत जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाइन जोडावी लागतील. अर्जात काही त्रुटी आढळल्यास त्यांची पूर्तताही ऑनलाइन करता येणार आहे. तसेच अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती अर्जदारांना ऑनलाइन ट्रॅकिंगद्वारे मिळवता येईल. त्यामुळे अर्जाची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी समिती कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांतील पुराव्यांबाबत समितीला शंका असल्यास किंवा सुनावणी आवश्यक वाटल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात येणार आहे. अशा प्रकरणांत अर्जदारांना प्रत्यक्ष समिती कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही. ----- सुनावणीसाठी तीन तारखांचे पर्याय जातपडताळणीच्या कागदपत्रांबाबत सुनावणी आवश्यक असलेल्या प्रकरणांत समितीकडून अर्जदारांना तीन तारखांचे पर्याय दिले जाणार आहेत. त्यापैकी सोयीची तारीख निवडून ऑनलाइन सुनावणी पूर्ण करता येईल. या प्रणालीचा लाभ विद्यार्थी, शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज करणारे उमेदवार, संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व लिपिक, निवडणुकीसाठी जातपडताळणी आवश्यक असलेले उमेदवार तसेच सेवा आणि इतर प्रयोजनांसाठी जातप्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्यांना होणार आहे. नव्या व्यवस्थेमुळे वेळेची बचत होण्यासोबतच कार्यालयीन धावपळ कमी होऊन प्रक्रिया अधिक सोईस्कर होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com