खवय्येगिरीने वाढवली ‘ऑनलाइन फूड’ची क्रेझ
- धाराशिवच्या खवय्येगिरीने वाढवली ‘ऑनलाइन फूड’ची क्रेझ
- निमशहरी धाराशिवमध्ये ही बदलतोय खाण्या-पिण्याचा ट्रेंड
............
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १६ ः बदलत्या जीवनशैलीमुळे आणि फास्ट फूडच्या वाढत्या क्रेझमुळे धाराशिवसारख्या निमशहरी भागातही आता घरपोच पार्सल आणि फूड डिलिव्हरीचा ट्रेंड झपाट्याने रुजला आहे. पूर्वी शहरात हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचा किंवा पार्सल आणण्याचा कल होता, मात्र आता मोबाइलमधील एका क्लिकवर जेवण थेट दारात येत आहे. विद्यार्थी, नोकरदार, रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांचा या ऑनलाइन सेवांना मोठा प्रतिसाद मिळत असून, शहरात रोज सुमारे ५०० हून अधिक ऑर्डर्सची उलाढाल होऊ लागली आहे.
शहरात घरपोच सेवा देणारी १० ते १५ हॉटेल्स आणि कॅफे असून, यात आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सचाही समावेश आहे. दुपार आणि रात्रीच्या जेवणात व्हेज-नॉनव्हेज पदार्थांसोबतच पिझ्झा, बर्गर, कोल्ड कॉफी आणि सँडविचला तरुण वर्गाकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. या वाढत्या ट्रेंडमुळे शहरात सुमारे ५० ते ६० तरुणांना ‘गिग वर्कर’ म्हणून हक्काचा रोजगार मिळाला आहे.
रस्त्यांवर धावणारे डिलिव्हरी हिरो
सकाळी आठपासून रात्री बारापर्यंत रस्त्यांवर डिलिव्हरी बॅग अडकवून फिरणारे हे तरुण आज शहराच्या अर्थकारणाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. याविषयी बोलताना डिलिव्हरी बॉय रजीउल्ला सय्यद म्हणाले, की मी रोज साधारण १५ ऑर्डर पूर्ण करतो. ग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक ऑर्डरमागे मिळणाऱ्या २० रुपयांच्या मोबदल्यातून माझी रोजची कमाई होते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आमची धावपळ सुरू असते. ऑनलाइन फूड डिलिव्हरीमुळे ग्राहकांची सोय तर झालीच आहे, शिवाय धाराशिवसारख्या शहरात रोज लाखो रुपयांची उलाढाल होऊन तरुणांसाठी रोजगाराचे नवे दालन खुले झाले आहे. बदलत्या काळासोबत धाराशिवकरही आता डिजिटल खवय्येगिरीकडे वळत असल्याचेच हे स्पष्ट चित्र आहे.
कॅफेचालकांची उलाढाल वाढली
फूड डिलिव्हरीच्या या सुविधेमुळे स्थानिक व्यावसायिकांच्याही विक्रीत मोठी वाढ झाली आहे. याबद्दल कॅफेचालक पृथ्वी जाधव सांगतात, की आमच्याकडे चार डिलिव्हरी बॉइज आहेत आणि प्रत्येकाकडून रोज १० ते १२ ऑर्डर्स डिलिव्हर होतात. ग्राहकांचा वाढता ओघ पाहता आम्ही सेवा अधिक गतिमान करत आहोत. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला नवी दिशा मिळाली आहे.
.........
धाराशिव ः खाद्यपदार्थांची ग्राहकाला घरपोच डिलिव्हरी देताना डिलिव्हरी बाॅय.