आचारसंहिता लागू असताना
दालनाचे उद्घाटन कसे?
--
‘वंचित’च्या विरोधात एमआयएम पक्षाची आयोगाकडे तक्रार
--
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना महापालिका मुख्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्याच्या दालनाचे उद्घाटन कसे काय होऊ शकते, असा आक्षेप एमआयएमने घेतला. याप्रकरणी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
महापालिकेतील वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसर खान यांना दिलेल्या दालनावरून राजकारण पेटले आहे. जनतेने कररूपाने भरलेल्या पैशांची उधळपट्टी करत प्रशासनाने या दालनावर एक कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप एमआयएमने केला होता. ‘केवळ चार नगरसेवक असताना एवढे मोठे दालन कसे काय दिले? आमच्या पक्षाचे ३६ नगरसेवक असताना गटनेत्याला दालन मिळाले नाही?’ मंत्री अतुल सावे यांना अफसर खान यांनी विधानसभा निवडणुकीत मदत केल्याने त्यांचे लाड केले जात आहेत’, असा आरोप समीर बिल्डर यांनी केला होता. हा वाद सुरू असतानाच बुधवारी (ता. १४) वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते अफसर खान यांच्या दालनाचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. ढोल-ताशे वाजवून आणि फटाके फोडून आंबेडकरांचे महापालिकेत स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमावर बिल्डर यांनी आक्षेप घेतला आहे. पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सुरू असताना दालनाचे उद्घाटन कसे करता येऊ शकते? असा प्रश्न करत याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे बिल्डर यांनी सांगितले. शिवाय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडेदेखील तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
---
महापौर, आयुक्त ठरवून गायब?
महापालिका मुख्यालयात हा कार्यक्रम सुरू असताना तत्कालीन महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे हे मुद्दाम महापालिकेत आले नव्हते. हा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनीच सूट दिली होती का, असा सवालही बिल्डर यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
--
सध्याचे खासदार दिसतात कुठे?
वंचित बहुजन आघाडीने २०१९ मध्ये शहरात एका पक्षासोबत युती करून मोठी चूक केली होती. ही चूक २०२४ च्या निवडणुकीत संबंधित उमेदवाराचा पराभव करून आम्ही सुधारून घेतली, असे वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना बिल्डर म्हणाले, ‘कोणत्या एका व्यक्तीमुळे इम्तियाज जलील खासदार झाले नव्हते, जनतेने त्यांना विजयी केले होते. खासदार असताना त्यांनी शहराचे अनेक प्रश्न मार्गी लावले; पण सध्याचे खासदार संसदेत दिसतात कुठे’, असा प्रतिसवाल त्यांनी केला.