esakal | कोरोना रुग्णांचे नातेवाईकच सुपर स्प्रेडर, चाचण्यांचे अहवाल चक्रावून देणारे

बोलून बातमी शोधा

Corona Test
कोरोना रुग्णांचे नातेवाईकच सुपर स्प्रेडर, चाचण्यांचे अहवाल चक्रावून देणारे
sakal_logo
By
तानाजी जाधवर -सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याची बाब अनेकदा समोर आली आहे, असे असतानाही त्यांना अभय मिळत होते. साहजिकच ही गर्दी कमी होत नव्हती. शेवटी प्रशासनाने रात्री अशा लोकांचा शोध घेऊन त्यातील ४५ जणांची अँटिजेन टेस्ट केली. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यावरुन कोरोना अशा मंडळीकडुन किती पसरला असेल याची कल्पना येते.

जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सध्या चारशेच्या जवळपास रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये आयसीयूमधील रुग्णांना नातेवाईकांची आवश्यकता असते. ही बाब सोडली तर इतर ठिकाणी देखील रुग्णांच्या नातेवाईकाची मोठी गर्दी दिसत होती. शिवाय हे नातेवाईक शहरात सगळीकडे वावरत होते, घरी डबा घेऊन येणे बाहेर रुग्णांना आवश्यक वस्तु घेऊन येणे आदीसाठी त्यांचा वावर होता.

पण त्यांना लक्षण नसल्याने त्यांनी टेस्ट केलेल्या नव्हत्या, अशा काळात ही लोक कोरोना पसरवित असल्याचे अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणुन देखील त्यांच्या बाबतीत गांभीर्याने घेतले नव्हते. शेवटी मंगळवारी रात्री उशीरा वेगळ्याच कारणाने जिल्हाधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शासकीय रुग्णालयात आले होते. त्यानी हे चित्र पाहिल्यानंतर त्यांनाही धक्काच बसला. त्यावेळी अशा फिरणाऱ्या लोकांच्या तातडीने टेस्ट करण्याच्या सुचना केल्या. तेव्हा नातेवाईक यानी तेथुन काढता पाय घेण्यास सूरुवात केली.

दंगल विरोधी पथकाला पाचारण करुन अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्या टेस्ट करण्यात आल्या. तेव्हा तिथे फक्त ४० ते ४५ जणच सापडले. त्या सगळ्याची टेस्ट केल्यानंतर त्यातील २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याना होम क्वारंटाईन न करता थेट सीसीसीमध्ये हलविण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. या लोकांमुळे कोरोनाचा किती प्रसार झाला असेल याचा अंदाज येणे शक्य आहे. हे सर्व लोक एका ठिकाणी न थांबता सगळीकडे फिरत असल्याचे चित्र होते. वारंवार सांगूनही यांनी कोणतीही काळजी घेतली नसल्याचे चित्र होते.