esakal | 'रेमडेसिवीर'चा तुटवडा भासणार नाही, ऑक्सिजन प्लँट उभारणार: शंकरराव गडाख
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Shankarrao Gadakh

'रेमडेसिवीर'चा तुटवडा भासणार नाही, ऑक्सिजन प्लँट उभारणार: शंकरराव गडाख

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : कोरोनाच्या उपाययोजनासाठी तातडीने जिल्हा नियोजन समितीमधुन एक कोटी रुपयाच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा दुर करुन राज्य आपत्ती निवारण फंडातून पाच ठिकाणी नव्याने हवेतील ऑक्सिजन प्लँट उभे करणार असल्याची माहिती पालकमंत्री शंकरराव गडाख यानी दिली. सोमवारी (ता.१९) ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यानी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच वैयक्तिक अकरा लाख रुपयाच्या निधीतून ऑक्सिजन कॉन्सेन्टेटरची उपलब्धतता करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, ज्ञानराज चौगुले, जिल्हा शल्यचिकित्सक डी.के.पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. श्री.गडाख म्हणाले की, जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण वाढले आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधी काम करत आहेत. काम करत असताना त्यातुन काही चुका होणार आहेत. मात्र फक्त चुकाचा शोधून त्यावर बोलणाऱ्यांकडे सध्या लक्ष देणे टाळण्याचा सल्ला त्यांनी यंत्रणेला दिला.

पुन्हा एकदा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सूरु करण्यात येत आहे. घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामीण भागासाठी माझा गाव कोरोनामुक्त गाव ही देखील मोहीम यावेळी सूरु केली जाणार आहे. यामध्ये एकाची पर्यवेक्षक म्हणून निवड केली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून पन्नास कुटुंबाकडे लक्ष ठेवले जाणार आहे. लक्षणे असलेल्या व्यक्तीला तातडीने उपचाराची सोय निर्माण होण्यासाठी ही मोहिम अधिक उपयोगी ठरणार असल्याचे पालकमंत्री गडाख यांनी सांगितले.

जिल्ह्याला सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. पुढे तो अधिक भासणार असल्याचे पाहुन त्याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. सध्या 12 मेट्रिक टनाची आवश्यकता असताना फक्त दहा ते अकरा टनाचीच उपलब्धता होत आहे. पुढील काळात रुग्णांची संख्या वाढणार असल्याने त्याची गरज वीस टनापर्यंत जाणार आहे, त्यामुळे ऑक्सिजनच्या प्लँटची उभारणी करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. यासाठी राज्य आपत्ती निवारण फंडातुन निधी देखील जाणार असल्याचे पालकमंत्री गडाख यानी सांगितले.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत बोलताना तुटवडा राज्यामध्ये असल्याने जिल्हा त्याला अपवाद नाही. पुढील धोका ओळखुन मार्चमध्येच दहा हजार मात्रांची ऑर्डर दिलेली होती. त्यातील आतापर्यंत दीड हजारच मात्रा जिल्ह्याला मिळाल्या आहेत. अजुनही त्यांच्याकडुन साडेआठ हजार मात्र येणे बाकी आहे. २१ तारखेनंतर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही असा अंदाजही श्री.गडाख यांनी यावेळी व्यक्त केला. आवश्यकता असेल तरच रेमडेसिविर देण्याच्या सूचना दिल्या असुन त्यासाठी एक अधिकारी नेमला असल्याचे त्यांनी सांगितले.