प्रयोगशील शेतकऱ्यांना गौरवाची सुवर्णसंधी!

प्रयोगशील शेतकऱ्यांना गौरवाची सुवर्णसंधी!
Published on: 
पान ४ अँकर --- आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार २५ हजारांपर्यंतचे बक्षीस गौरवाची सुवर्णसंधी; ‘आत्मा’ उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारासाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १९ (बातमीदार) : शेतीत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आणि विक्रमी उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी गौरवाची सुवर्णसंधी चालून आली आहे. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) योजनेंतर्गत सन २०२६-२७ मधील तालुका व जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्यास आता ११ डिसेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीच्या मुदतीत पुरेसे प्रस्ताव प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना संधी मिळावी म्हणून ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी दिली. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विस्तार सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरावर ‘आत्मा’ ही स्वायत्त यंत्रणा कार्यरत असून, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती पद्धती आणि कृषी विस्तार सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. याच योजनेंतर्गत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण प्रयोग, सेंद्रिय शेती आणि पूरक व्यवसायांतून उच्च व दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार’ प्रदान केला जातो. या सन्मानामुळे प्रयोगशील शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावतो आणि इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक शेतीची प्रेरणा मिळते. या पुरस्काराचे स्वरूप अत्यंत आकर्षक असून, बीड जिल्ह्यात यंदा एकूण २७ प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यासाठी एकूण ५ जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार दिले जातील, ज्याचे स्वरूप प्रत्येकी २५ हजार रुपये इतके आहे. तसेच, जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण २२ तालुकास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, याचे स्वरूप प्रत्येकी १० हजार रुपये इतके आहे. मूल्यांकन समितीच्या शिफारशीनुसार अंतिम निवड झालेल्या सर्व विजेत्या शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. केवळ पारंपरिक शेतीच नव्हे, तर कृषी, फलोत्पादन, पशुपालन व दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, कृषी अभियांत्रिकी, सेंद्रिय शेती तसेच शेतीपूरक नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. या निवड प्रक्रियेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, अधिकाधिक नव्या व होतकरू शेतकऱ्यांना सन्मानाची संधी मिळावी यासाठी शासनाने महत्त्वाची अट घातली आहे. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी शासनाचा (आत्मा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा) पुरस्कार प्राप्त झालेला आहे, असे शेतकरी या पुरस्कारासाठी अपात्र ठरतील. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून किंवा आत्मा कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावा. अर्जात आपल्या शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांची व उत्पादनाची सविस्तर माहिती नमूद करून, त्यासोबत विहित नमुन्यातील अर्जात नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे (जसे की जमिनीचे अभिलेख, आधार कार्ड, बँक पासबुक प्रत आणि प्रत्यक्ष शेती उपक्रमांची छायाचित्रे) जोडणे गरजेचे आहे. परिपूर्ण प्रस्ताव ११ डिसेंबर २०२६ पूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक सुभाष साळवे, उपसंचालक सुरज पाटील, जुबेर पठाण आणि गाझीयोद्दीन काझी यांनी केले आहे. ---- पुरस्काराचे स्वरूप, पात्रता आणि अटी - पुरस्कार काय आहे? : ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) योजनेंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण प्रयोगांतून विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार आहे. - जिल्हास्तरीय पुरस्कार : एकूण ५ पुरस्कार (प्रत्येकी २५ हजार रुपये). - तालुकास्तरीय पुरस्कार : ११ तालुक्यांसाठी प्रत्येकी २ असे एकूण २२ पुरस्कार (प्रत्येकी १० हजार रुपये). - कोणाला दिला जातो? : शेती, फलोत्पादन, पशुपालन व दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, सेंद्रिय शेती आणि कृषीपूरक व्यवसायांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य. - प्रमुख अट : यापूर्वी शासनाचा (आत्मा किंवा अन्य शासकीय योजनेचा) पुरस्कार मिळालेले शेतकरी या पुरस्कारासाठी अपात्र ठरतील. -------------------------------------------------- अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे - अर्जाचा नमुना : संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा आत्मा कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करावा. - अर्ज कोठे जमा करावा? : परिपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. - अंतिम मुदत : ११ डिसेंबर २०२६ (मुदतवाढीची अंतिम तारीख). - आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्जात नमूद केलेली कागदपत्रे (जमिनीचा अभिलेख, आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, प्रत्यक्ष शेतीतील उपक्रमांची छायाचित्रे व इतर आवश्यक तपशील).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.