साडेअठरा हजार दुचाकीस्वारांवर कारवाई
----
जिल्ह्यात हेल्मेटसक्तीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २२ ः जिल्ह्यात राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावर पोलिसांनी हेल्मेटसक्ती केली आहे. एक सप्टेंबरपासून ही सक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून गेल्या २१ दिवसांत १८ हजार ४२४ दुचाकीस्वारांवर हेल्मेट न वापरल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी लातूर पोलिस दलाच्या वतीने हेल्मेट व सीट बेल्ट वापराच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिस दलाकडून सातत्याने दंडात्मक कारवाई करण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवारी (ता. २१) एकाच दिवसात हेल्मेट न वापरणाऱ्या तब्बल एक हजार २१ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर एक सप्टेंबरपासून २१ सप्टेंबरपर्यंत एकूण १८ हजार ४२४ वाहनचालकांवर हेल्मेटसक्तीची कारवाई करण्यात आली आहे.
रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या डोक्याला होणारी गंभीर दुखापत व त्यातून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी हेल्मेटचा नियमित वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे केवळ दंडात्मक कारवाई न करता नागरिकांमध्ये ‘हेल्मेट म्हणजे दंडापासून बचाव नव्हे, तर जिवाच्या सुरक्षेचे साधन’ ही भावना निर्माण करण्यासाठी लातूर पोलिस दलाकडून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी हेल्मेट जनजागृती शिबिरे, नागरिकांशी संवाद, वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.