पैठण तालुक्यात सामाजिक एकतेचा आदर्श
-
४७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’; पोलिसांकडून चोख बंदोबस्त
पैठण, ता. १६ (बातमीदार) : तालुक्यातील तब्बल ४७ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना स्वीकारत सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण केला आहे. संपूर्ण गावाने एकत्र येऊन एकाच गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागात सलोख्याचे वातावरण दिसून येत आहे. तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला असून, विविध भागांत शेकडो मंडळांनी श्रींची विधिवत प्रतिष्ठापना केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने गेल्या १५ ते २० दिवसांपासून नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे. शांतता समितीच्या बैठका घेऊन मंडळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यात पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ७८ गावांत १२७ सार्वजनिक गणपती असून, यातील १५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’चा आदर्श जपला आहे. बिडकीन पोलिस ठाण्यांतर्गत ५८ पैकी २१ गावांनी हा निर्णय घेतला, तर औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९७ मंडळांपैकी ५ गावांत एकच गणपती बसविण्यात आला आहे. याशिवाय पैठण शहर व ग्रामीण भागातील ३२ गावांमध्ये १०९ मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली असून, त्यात ६ गावांचा समावेश आहे. संवेदनशील भाग, मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळे आणि प्रमुख चौकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
प्रतिक्रिया
पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण शहर व ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमातून समाजात चांगला संदेश जातो. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे.
- सुनील पाटील,
उपविभागीय पोलिस अधिकारी, पैठण
--
प्रतिक्रिया
गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि मंगलमय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने सर्वंकष नियोजन केले आहे. सर्व गणेश मंडळ पदाधिकारी व नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.
- महादेव गोमारे,
पोलिस निरीक्षक, पैठण