औरंगाबाद : ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षणाचे काम पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paithan Village survey complete by drone

औरंगाबाद : ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षणाचे काम पूर्ण

पैठण : येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून तालुक्यातील १३० गावांचे स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता जमीन मालकीचे प्रमाणपत्र (ई- प्रॉपर्टी कार्ड) २५ हजार कुटुंब प्रमुखांना लवकरच वाटप केल्या जाणार आहे.

महाराष्ट्रात टोपो पद्धतीने केली गेलेली जमीन मोजणी आजही अस्तित्वात आहे. मात्र, सातत्याने ग्रामीण भागात वाढत असलेली लोकसंख्या आणि विकास योजनांमुळे भौगोलिक बदल होत आहेत. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून ड्रोन पद्धतीने जमीन मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार १३० गावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, १९ गावांचे यापूर्वीच नगरभूमापन झाले आहे. भूमी अभिलेख उपसंचालक अनिल माने, जिल्हा अधीक्षक अभय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक रमाकांत डाहोरे, शिरस्तेदार संजय बोर्डे यांनी मोजणीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. दरम्यान, शासनाकडून करण्यात आलेल्या या मोजणीचे शुल्क जागा मालकांना आकारले जाणार आहे. त्यानुसार १ ते २५ चौरस मीटरपर्यंत १२५ रुपये, २५ ते ५० चौरस मीटरपर्यंत २५० रुपये, ५० ते १०० चौरस मीटरपर्यंत ५०० रुपये आणि १०० चौरस मीटर पुढील प्रत्येक चौरस मीटर क्षेत्रास ५ रुपयांप्रमाणे सनद शुल्क आकारले जाणार आहे.

सर्व्हे ऑफ इंडियाचे अभियंता वैभव जामवदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत व पोलिस यांचा प्रामुख्याने या मोजणीत सहभाग होता.

ग्रामीण भाग आणि शहरात वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे होणारा विकास आणि भौगोलिक बदल याची माहिती जाणून घेण्यासाठी ड्रोनद्वारे जमीन मोजणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मोजणी आता पूर्ण झाली आहे. यापुढे गाव नमुना ८ कालबाह्य झाल्याने संपूर्ण काम हे सनद, आखीव पत्रिका यावरच होणार असून, ग्रामस्थांना घरकुल खरेदी- विक्री, कर्ज मिळविण्यासाठी सोयीचे होणार आहे.

- रमाकांत डाहोरे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, पैठण

Web Title: Paithan Village Survey Complete By Drone Land Ownership Certificate 25000 Family

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top