फोटोसह ABD26J80876
सेनगाव ः तालुकास्तरिय खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावणारे पानकनेरगाव जि.प. प्रशालेचे मुलींचे संघ.
------------
पानकनेरगावच्या लेकींचा मैदानावर डंका; खो-खोमध्ये दुहेरी बाजी
१४ व १९ वर्षे वयोगटांत तालुक्यात प्रथम क्रमांक; दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सेनगाव बातमीदार : तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुलींनी शानदार कामगिरी करत दोन्ही वयोगटांत विजेतेपद पटकावले. १४ आणि १९ वर्षे वयोगटातील दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवत पानकनेरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सेनगाव तालुक्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. चुरशीच्या सामन्यांत पानकनेरगावच्या मुलींनी चपळता, अचूक डावपेच आणि उत्तम सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. खेळातील जिद्द, आत्मविश्वास आणि एकजुटीच्या बळावर दोन्ही संघांनी अव्वल स्थान मिळविले.
दुहेरी विजयाने गावात आनंदाचे वातावरण
एकाच स्पर्धेत दोन वयोगटांत प्रथम क्रमांक मिळविण्याची कामगिरी शाळेसाठी अभिमानास्पद ठरली आहे. या यशामुळे खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, गावात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. आता जिल्हा स्तरावरही पानकनेरगावच्या लेकींच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक गाडे सर, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित सराव आणि खेळाडूंची मेहनत यामुळे हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.