फोटोसह ABD26J79682
सेनगाव ः पानकनेरगावात तरुणांनी एकत्र येत मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले.
-------------
पानकनेरगावात लोकवर्गणीतून खड्डे बुजवले
---------
प्रशासनाची अनास्था अन् तरुणांची ‘गांधीगिरी’!
सेनगाव, ता. १८ (बातमीदार) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील पानकनेरगाव येथे तरुणांनी प्रशासनाच्या अनास्थेविरुद्ध गांधीगिरी केली. प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून खड्डे बुजवले आणि श्रमदानातून मुख्य रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली.
पानकनेरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा परिषद शाळेपर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. मात्र, या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक, शाळकरी मुले, पादचाऱ्यांचे हाल होत होते. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यातून वाहने गेल्यानंतर चिखलमिश्रित पाणी थेट शाळकरी विद्यार्थ्यांच्या अंगावर उडण्याचे प्रकार नित्याचेच झाले होते. रस्त्याच्या या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, संबंधित विभागाकचे वारंवार उंबरठे झिजवले, मात्र आश्वासनांशिवाय काहीच हाती लागले नाही. अखेर गावाचा प्रश्न गावकरीच सोडवतील,’ अशी ठाम भूमिका घेत युवकांनी पुढाकार घेतला. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत ग्रामस्थांनी आपापसात लोकवर्गणी गोळा केली. या निधीतून गिट्टी व मुरूम आणून गावातील तरुणांनी स्वतः फावडे हातात घेत श्रमदानातून रस्ता दुरुस्त केला.
((चौकट))))
कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी
मुख्य रस्ता शाळकरी मुले, पादचारी आणि वयोवृद्धांसाठी अत्यंत धोकादायक बनला होता. प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही कार्यवाही न झाल्याने अखेर आम्हालाच लोकवर्गणीतून खड्डे बुजवावे लागले. आता प्रशासनाने गांभीर्याने पुढाकार घेऊन या रस्त्याची पक्की आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.
((चौकट)))
तत्काळ दखल घेण्याची मागणी
मुक्तिसंग्रामदिनी तरुणांनी केलेल्या या कृतीतून प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारावर जोरदार चपराक बसली आहे. ग्रामस्थांच्या या श्रमदानाने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी खड्डे बुजविणे हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने आतातरी गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याचे दर्जेदार आणि पक्के बांधकाम करावे, अशी मागणी पानकनेरगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.