ABD26J81570 सवना ः पैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी ऑक्टोबरमध्ये भरलेले असते. पण, आता ते कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. (छाया : अमोल नायक)
-----
पैनगंगेचे पात्र कोरडेठाक
----
सवना परिसरात बॅरेजचा तळ उघडा
----
सवना, ता. १७ (बातमीदार) : मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र ऑक्टोबर महिन्यातच कोरडे पडल्याने सीमावर्ती भागात भीषण पाणीटंचाईचे विदारक चित्र समोर आले आहे. अपुऱ्या पावसामुळे नदीवरील विविध बॅरेजमधील जलसाठा पूर्णपणे आटला असून, काही ठिकाणी केवळ अत्यल्प पाणी शिल्लक आहे. परिणामी, सेनगाव तालुक्यातील सवना परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचे मोठे संकट ओढवले आहे. दरवर्षी मुबलक पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा आधार मिळायचा. मात्र, यंदा नदीचे पात्र वाळवंटासारखे भासू लागल्याने हिवाळी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. जलस्रोत आटल्यामुळे रब्बी हंगामातील उत्पादनात मोठी घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.
---
रब्बीचे क्षेत्र घटणार
पावसाने ओढ दिल्याने जमिनीत ओलावा उरलेला नाही. शेतातील हळद, तूर आणि कापूस ही पिके सध्या धोक्यात आली आहेत. भूजल पातळी खालावल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
---
पशुधनाची पाण्यासाठी भटकंती
नदीतील पाणी आटल्याने परिसरातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी जंगलात दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. त्यातच चाराटंचाईचे संकट उभे ठाकल्याने जनावरांना पाणी आणि चारा कसा पुरवायचा, या विवंचनेत पशुपालक शेतकरी सापडले आहेत.