सातबाऱ्यावर नावे नोंदवा
पारधी समाजाचे धरणे आंदोलन
धाराशिव, ता. १८ : तालुक्यातील ढोकी येथील गट नंबर ३५ मधील जमिनीवरून कोणतीही पूर्वसूचना न देता बेदखल केल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित जमिनीच्या सातबाऱ्यांवर नावे नोंदविण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजबांधवांनी गुरुवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
नाना कलाप्पा चव्हाण व इतर झोपडपट्टीधारकांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानुसार, १२ सप्टेंबर २०२६ दुपारी १२ः३०च्या सुमारास प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली. या जमिनीवरील नियमित करण्यात आलेले अतिक्रमण जबरदस्तीने हटवून रहिवाशांना तेथून बेदखल करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
जमिनीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात तसेच महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे प्रलंबित आहे. यापूर्वी उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकेत निकाल अर्जदारांच्या बाजूने लागलेला असताना आणि वरिष्ठ पातळीवर प्रकरण प्रलंबित असताना, पूर्वपरवानगीशिवाय करण्यात आलेली ही कारवाई रद्द करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रशासनाशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
......