परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त
जाहीर कराः आमदार विटेकर
कृषिमंत्र्यांकडे हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता.२० : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांची मोठी हानी झाली असून आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळी उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात, शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांबाहेर जाऊन हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी केली.
नांदेड येथील पीक आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन सहभागी होत आमदार विटेकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना जिल्हा प्रशासनामार्फत निवेदन दिले. निवेदनानुसार जून ते १७ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात अपेक्षित ६८८ मिलिमीटरच्या तुलनेत केवळ ३७४ मिलिमीटर म्हणजे ५४.४ टक्के पाऊस झाला आहे. सोनपेठमध्ये ४४.२, सेलू ५०, मानवत ४७.६, पाथरी ५२, परभणी तालुक्यात ५३.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शासकीय आकडेवारीनुसार १८ ते २२ दिवसांचा पावसाचा खंड असला, तरी सुमारे ७२ टक्के गावांमध्ये २७ ते ४२ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे हलक्या व मध्यम जमिनीतील सोयाबीन पूर्णपणे वाळले असून मूग पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. कापसाची वाढ खुंटली असून पाते व फुलांवर परिणाम झाला आहे.
((चौकट)))
स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना करा
उपलब्ध पाणीसाठाही चिंताजनक असून ढालेगाव ४९, तारूगव्हाण ५४, मुदगल ७२ आणि निम्न दुधना बंधाऱ्यात २२ टक्के पाणीसाठा आहे. आगामी काळात टंचाईची शक्यता लक्षात घेऊन गावनिहाय नियोजन, रोजगार हमीची कामे वाढविणे आणि स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही विटेकर यांनी केली.