परभणी दीपोत्सव लेख...
PRB26B66981
--------
संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रकाशाचा सण
-------------
दिवाळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी, मोठा आणि आनंदाचा सण आहे. हा सण केवळ दिव्यांची रोषणाई, फराळ आणि फटाक्यांपुरता मर्यादित नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे जतन करण्याची सुंदर संधी असतो. दिवाळीच्या सर्वंकष तयारीत साफसफाई, जुन्या वस्तूंची स्वच्छता, नवीन वस्तूंची खरेदी, आकाशकंदील बनवणे अथवा आवडीच्या आकाशकंदिलांची खरेदी या सर्व गोष्टी लहानांच्या मनावर संस्कार करणाऱ्या, तर मोठ्यांचा संस्कार काळानुरूप संवर्धित करणाऱ्या असतात.
- सुवर्णा व्यंकट मुळजकर, परभणी
---
‘आली माझ्या, घरी हि दिवाळी’ म्हणत म्हणत दिवाळीत घराची स्वच्छता करताना घरातील सर्वच लहानथोर मंडळी हातभार लावतात. त्यातून होणारे संवाद, जवळीक, एकमेकांची काळजी करणे, आवडी निवडी सांभाळणे हे सारे कुटुंबाला-परिवारास घट्ट बांधून ठेवणारे असतात. घराची स्वच्छता करताना जुन्या आठवणी जाग्या होऊन, दूर गेलेली मने एकत्र येतात. नात्यांतील प्रेमाची ऊब वाढते. काळ कितीही पुढे गेला तरी आजही घर व परिसराची स्वच्छता करणे, आकाशकंदील लावणे, पणत्या लावणे, रांगोळी काढणे आणि पारंपरिक फराळ तयार करणे या प्रथा आजही मोठ्या उत्साहाने पाळल्या जातात. यांमधून पुढील पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होते. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे, नातेवाईक व मित्रांना भेटणे, एकमेकांकडे फराळाला जाणे आणि गरजू व्यक्तींना मदत करणे यामुळे प्रेम, आपुलकी तर वाढतेच; परंतु सामाजिक बांधिलकीची भावनाही रुजत जाते. आजच्या आधुनिक युगात काळानुरूप बदल स्वीकारताना आपल्या चांगल्या परंपरांचे जतन करणे आवश्यक आहे. स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या मातीच्या पणत्या, आकाशकंदील, सजावटीच्या विविध वस्तू खरेदी करून आपला आनंद साजरा करताना त्यांना प्रोत्साहनही देता येते. नवीन संकल्पनेनुसार पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करून संस्कृतीसोबत निसर्गाचेही संवर्धन करता येते. अशा प्रकारे लोक दिवाळीचा खरा आनंद, परंपरा जपत, संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोचवत आणि समाजात प्रेम व बंधुभाव वाढवत आजही साजरा करत आहेत. आमच्या लहानपणी दिवाळीची पहाट म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रसन्नतेने भरलेला अविस्मरणीय अनुभव! मराठवाड्यात दिवाळीच्या पहाटेला एक वेगळाच गंध होता! त्या चार दिवसांच्या सणाला एक वेगळेच साधेसुधे सौंदर्य होते. हा चार दिवसांच्या सणाचं हळूहळू खुलत हळूहळू मिटणारं स्वरूप पंधरा दिवस चालत असे. थंडीची बोचरी सुरवात पहाटेच्या थंडगार वातावरणात दूरवरून येणारा मंदिरातील घंटानाद आणि कोंबड्यांचा आरव मन प्रसन्न करून टाकत असे. घराघरांत आठ दिवस आधीपासूनच भाजणीचे आणि सर्व प्रकारच्या दळणांचे वास दरवळत असत. धनत्रयोदशीला हमखास तळणवळणाचे भूक चाळवणारे आणि जिभेला जागवणारे वास अगदी जोरकसपणे दरवळत असत. आजही मराठवाड्यात दिवाळीची खरी सुरवात वसुबारसेने होते. शेतकरी आपल्या मित्र असणाऱ्या मुक्या प्राण्यांची, गाय-वासरांची मनोभावे पूजा करतात. ‘दिन-दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी’ हे गीत प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात रुजत जाते. मराठवाड्यातील शेतकरीवर्गासाठी नवीन आलेले पीक आणि धान्य हेच त्यांचे खरे धन असते. धनत्रयोदशी आणि पाडव्याला नवीन धान्याची व शेती अवजारांची पूजा केली जाते. किल्ला बांधणे, पांडवांची पूजा हेदेखील हिरीरीने, श्रद्धेने सगळे करताना दिसतात. अतिवृष्टी किंवा दुष्काळाचे संकट असले, तरीही मराठवाड्यातील शेतकरी सर्व दुःख विसरून अत्यंत जिद्दीने व उत्साहात दिवाळी साजरी करतात. त्यानंतर धनत्रयोदशीपासून खरी दिवाळीची लगबग सुरू होते. ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले’ हे गीत अक्षरशः खरे करत अंगणात सुंदर रांगोळ्या, दारात आकाशकंदील आणि पणत्यांची आरास रंगून जाते! सोबतच अभ्यंगस्नानासाठी तयार केले जाणारे तिळाचे उटणे, सुगंधी तेल, गरम पाण्याची तयारी हे सारेच मंगल मंगल वाटणारे. नवीन कपडे घालून लहान मुले लहान फटाके फोडत आनंदाने नाचताना दिसतात. पूर्वी ‘उठी उठी गोपाला’, ‘ज्योतिकलश छलके’, ‘उठा उठा हो सकळीक’, ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा’, ‘प्रभात झाली ऊठ महागणपती’ या गीतांनी सकाळ व्हायची... सकाळी सहाला सुप्रभात म्हणतच रेडिओच्या आवाजाबरोबरच दिवस सुरू व्हायचा! किंबहुना या भूपाळ्यांनी रंगून पहाटेपासूनच वातावरणनिर्मिती व्हायची. अंगणात सडा-रांगोळी, देवघरात तेवणारी समई, त्याबरोबर वडीलधाऱ्या स्त्रियांच्या काचेच्या बांगड्यांच्या किणकिण आवाजासोबत तिच्या गोड आवाजातील देवाचे गुणगान सगळंच कसं मंगलमय! भूपाळी म्हणजे तरी काय, देवाला जागे करण्यासाठी शब्द, भाव आणि सूर यांनी युक्त अशी मनापासून घातलेली साद! खरं पाहिलं तर ती साद म्हणजे आपल्याच अंतर्मनाला जागं करण्याचा मार्ग, कारण देव तर रात्रंदिवस जागाच आहे, पण आपल्याच अंतरंगात असलेल्या आत्मारामाला जागं ठेवण्याची ती एक पद्धत! रात्रभर विसावलेलं मन पहाटेच्या शांत वातावरणात भक्तीने भरून देवाच्या नामस्मरणाने दिवसाची सुरवात व्हावी, मनात चांगले विचार यावेत आणि दिवसभराचे व्यवहार प्रसन्नतेने पार पडावेत, हीच त्या प्रांत: संगीताची उपलब्धी! मनाला शांतता देणारा दिवाळीतील पणत्यांचा मंद प्रकाश, घरोघरीच्या फराळाचा सुखद सुगंध, सौंदर्यपूर्ण आकाशकंदील, अंगणाचे म्हणजेच पृथ्वीचे सुशोभन करणारी रांगोळी आणि नातेवाइकांच्या भेटी, या सर्वांतून दिवाळी आपल्याला एक प्रकारे सुंदर संदेश देत असते. जसा दिवा अंधार दूर करतो, प्रेम, माणुसकी आणि सकारात्मक विचार आपल्या जीवनातील दुःख व निराशा दूर करू शकतात. म्हणूनच दिवाळी हा प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव्या सुरवातीची ज्योत प्रज्वलित करणारा आणि संस्कृतीची जोपासना करणारा सण आहे.