(टुडे चारसाठी बॅनर)
परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा
- पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कपाशीचे पीक धोक्यात
-विविध पक्ष-संघटनांचा प्रशासनाकडे तत्काळ उपाययोजनांचा आग्रह
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १० ः जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने दीर्घ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सोयाबीन, कपाशी या प्रमुख नगदी पिकांची अवस्था गंभीर असून, अनेक भागांत पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
पावसाच्या खंडामुळे शेतातील उभी पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. सेलू तालुक्यात एका शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे सोडल्याची घटना समोर आली आहे. तर मानवत तालुक्यात एका शेतकऱ्याने सात एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला. या घटनांमुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती अधोरेखित झाली आहे. सोयाबीन सध्या फुलोरा, शेंगा भरण्याच्या टप्प्यावर असताना पाण्याअभावी फुलांची गळती होत आहे. लागलेल्या शेंगा झाडावरच करपून जात आहेत. कापशीचे पाते, बोंडे वाळून गळत असून अनेक ठिकाणी झाडे माना टाकू लागली आहेत. भाजीपाला, इतर खरीप पिकांनाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. बागायती क्षेत्रातील ऊस, हळद यांसारख्या पिकांवरही पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने बहुतांश जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पावसाने आणखी ओढ दिल्यास जिल्ह्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि शेतीसाठी पाणी या तिन्ही आघाड्यांवर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
-----------
सरसकट मदतीची मागणी
जिंतूर तालुक्यातही पावसाचा दोन महिन्यांहून अधिक काळ खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया न राबवता सरसकट आर्थिक मदत द्यावी, तसेच मागील आणि चालू वर्षाचा पीक विमा तातडीने वितरित करावा, अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
-----------
किसान सभा उतरणार रस्त्यावर
परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अन्यथा शनिवार, ता. १२ पासून गंगाखेड-परभणी राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सभेतर्फे जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे.
((चौकट)))
वंचित बहुजन आघाडी आक्रमक
मानवत तालुक्यातही कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांचे अनुदान, पीक विम्याची तातडीने मंजुरी, प्रत्येक दहा किलोमीटरच्या अंतरावर चारा छावण्या, भूमिहीन शेतमजुरांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत आणि रोजगार उपलब्ध करून देणे, परीक्षा व शालेय शुल्क माफ करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
---
अशा आहेत मागण्या...
सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या सर्व तालुके व महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी,
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, पीक विम्याची अग्रीम रक्कम तातडीने वितरित करावी, रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत, मोफत चारा छावण्या सुरू कराव्यात, कृषीपंपांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा.
-------------