भांडण सोडवण्यास गेलेल्या
मेहुण्यावर चाकूने केले वार
परभणी, ता. १४ ः जुना पेडगाव रस्त्यावरील बालाजीनगर येथे बहीण व भाऊजींचे सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मेहुण्यास चाकूने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी भाऊजीवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी बालाजीनगर येथील सोमनाथ नागनाथ स्वामी यांनी शुक्रवारी (ता.१३) कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आपली लहाण बहिण मोनिका ही पती कृष्णा स्वामीसोबत बालाजीनगर येथे राहते. भाऊजी कृष्णा यास दारूचे व्यसन असून तो कामधंदा करीत नाही. दारू पिल्यानंतर तो बहीण मोनिकासोबत नेहमी भांडत असतो. नऊ नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजता बहिणीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने मोनिकास पती मारहाण करीत असल्याचे मोबाइलवर कळविले. म्हणून आपली आई लक्ष्मीबाई बहिणीच्या घरी गेल्या परंतु त्या लवकर परत न आल्यामुळे आपणही बहिणीकडे गेलो व भांडण सोडवत असताना कृष्णा याने तु का आला म्हणून शिवीगाळ केली व घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने अचानक कमरेवर, पाठीवर वार करण्यास सुरवात केली. त्यामुळे आपण जखमी झालो, रक्त निघू लागले. तेव्हा आपण मामेभाऊ अजय स्वामी यास फोन लावून बोलावले व त्याने आपणास सरकारी दवाखान्यात दाखल केले. यावेळी ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून कृष्णा स्वामी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
-----------