परभणीत महिलांच्या गळ्यातील गंठण, मंगळसूत्र चोरट्यांच्या निशाण्यावर

परभणीत महिलांच्या गळ्यातील गंठण, मंगळसूत्र चोरट्यांच्या निशाण्यावर
Published on: 
गंठण, मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ ----------------- परभणी पोलिसांचा दरारा संपला का? महिलावर्गात भीतीचे वातावरण कुठेय पोलिस... सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १३ ः शहरात रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे गंठण आणि मंगळसूत्र हिसकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे. सकाळ, दुपार किंवा सायंकाळ अशी कोणतीही वेळ चोरट्यांसाठी आड येत नसल्याचे चित्र आहे. शहरातील नागरी वसाहती असो किंवा वर्दळीचे रस्ते, महिलांचे दागिने हिसकावून चोरटे सहज पसार होत असल्याने परभणीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोन्याचे गंठण, मंगळसूत्र हे महिलांसाठी केवळ दागिने नसून भावनिक आणि आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे असतात. मात्र, शहरात रस्त्याने चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने सुरक्षित राहिलेले नाहीत, अशी भावना नागरिकांत निर्माण होत आहे. चोरट्यांकडून अचानक येऊन दागिने हिसकावले जात असल्याने महिलांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांना ना दिवसाढवळ्या चोरी करण्याची भीती, ना रहदारीच्या रस्त्यांचा धाक. गर्दीच्या ठिकाणीही अशा घटना घडत असतील, तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. --------- ठोस प्रभावी कारवाई होईना शहरात अशा घटना वारंवार घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मात्र, या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ठोस आणि प्रभावी कारवाई होताना दिसत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. चोरट्यांचे धाडस वाढत असताना पोलिसांचा धाक नेमका कुठे हरवला? गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली आहे की नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे सांगणे पुरेसे नाही. महिलांचे दागिने लुटणाऱ्या टोळ्यांचा शोध घेणे, सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयितांवर लक्ष ठेवणे, संवेदनशील भागांत नियमित गस्त वाढवणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे. ------------- पोलिसांची गस्त कुठे दिसेना! शहरातील विविध भागांत पोलिसांची नियमित गस्त प्रभावीपणे सुरू आहे का, हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. महिलांना सुरक्षितपणे रस्त्यावरून चालताही येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. पोलिस प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांच्या तत्काळ मुसक्या आवळून दरारा निर्माण करण्याची गरज आहे. पोलिस काहीच करणार नसतील, तर मंगळसूत्र सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही आता महिलांनीच घ्यायची का? शहरात पोलिस आहेत, पोलिस ठाणे आहेत, यंत्रणा आहे; मग चोरट्यांना एवढे मोकळे रान कशामुळे? कुठे आहेत पोलिस? हा नागरिकांचा सवाल आता तरी गांभीर्याने घ्यावा, अशी परभणीरांची अपेक्षा आहे. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.