ऐतिहासिक ५२ वारसास्थळांच्या
प्रदर्शनाचे परभणीमध्ये उद्घाटन
जतन, संवर्धन व पर्यटनवाढीसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
परभणी, ता.१८ : विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी १५ व १६ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित ऐतिहासिक वारसा कार्यशाळेस भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील एकूण ५२ ऐतिहासिक वारसा स्थळांची माहिती संकलित करून तयार करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला असून, जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, पुरातत्त्वीय स्थळे, सांस्कृतिक वारशाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, या स्थळांचे जतन व संवर्धन करणे, पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना देणे, या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५२ ऐतिहासिक वारसा स्थळांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख निर्माण होण्यासोबतच या स्थळांच्या पर्यटनविषयक क्षमतेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींचे कौतुक करून ऐतिहासिक वारशाचा अभ्यास, त्याचे दस्तऐवजीकरण, जतन व संवर्धन यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा स्थळांचा अभ्यास करणारे अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळणार असून, जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीषा माथुर, पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, पुरातत्त्व विभाग, छत्रपती संभाजीनगरचे सहायक संचालक अनिल गोटे, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खंडके यांच्यासह संबंधित अधिकारी, अभ्यासक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करून त्याला पर्यटनाच्या माध्यमातून व्यापक ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
….