वैयक्तिक स्वच्छतागृह बांधणीस गती
-------
जिल्ह्यात मार्चअखेर उद्दिष्टपूर्तीचा प्रशासनास विश्वास
-----
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २६ ः स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोनअंतर्गत परभणी जिल्ह्यात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधणीच्या कामांना गती मिळत असून, चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. २०२६-२७ साठी जिल्ह्याला चार हजार १२५ स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ९८४ कामे पूर्ण झाली आहेत.
एक हजार ६०० कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. उपलब्ध निधी आणि प्रशासकीय पाठपुराव्याच्या माध्यमातून उर्वरित कामेही पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे, उघड्यावर जाण्याची प्रथा रोखणे, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून गावांना स्वच्छ व आदर्श बनविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्वच्छतागृहाचे जिओ टॅगिंग करणे आवश्यक असून, त्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा केली जाते. बांधकामासाठी मागील महिन्यात जिल्ह्याला १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी संबंधित तालुक्यांना वर्ग करून लाभार्थींच्या खात्यांत अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ५३४ लाभार्थींना अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, आणखी चार कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाल्याने बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थींना आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती मिळत आहे.
------
गंगाखेड तालुका आघाडीवर
जिल्ह्यात स्वच्छतागृह बांधणीत गंगाखेड तालुका आघाडीवर असून, त्यानंतर जिंतूर, परभणी, पूर्णा, सेलू या तालुक्यांचा क्रम लागतो. चालू वर्षातील उद्दिष्टासोबतच मागील कालावधीतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठीही प्रशासन प्रयत्नशील आहे. शासनाने चालू वर्षातील कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी मार्चअखेरपर्यंत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गाढे यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात स्वच्छतेच्या सुविधा वाढवून निरोगी आणि स्वच्छ गावांची निर्मिती करण्यासाठी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
-----------------