ऐण सणासुदीत वीजपुरवठा खंडित
---------
परभणीकरांना उकाडा असह्य, डासांचाही त्रास
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १८ ः ऐन गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरी सण उत्सवात शहरातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचे सत्र यंदाही कायम राहिल्याने परभणीकरांचे हाल झाले. शुक्रवारी (ता.१८) पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. दुपारीही विजेचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे उकाडा, डासांचा सामना करीत महालक्ष्मीपूजनाची तयारी करणाऱ्या कुटुंबांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
सण उत्सवाच्या काळात विजेचा भार अधिक होतो हे माहीत असतानाही ‘महावितरण’ त्यावर काहीही उपाययोजना करीत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले. दिवाळीच्या पहिल्या पाण्याला पहाटे, लक्ष्मीपूजनावेळीही वीजपुरवठा काही काळ खंडित होणार म्हणजे होणार. दसऱ्याच्या वेळेसदेखील ऐन सीमोल्लंघनावेळी बत्ती गुल होण्याचे प्रकार नेहमीच होतात. त्याचबरोबर अन्य सण-उत्सवाबरोबरच महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमातही वीजपुरवठा खंडित होतोच. मग ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुका असो की श्री. गणेश, देवीच्या विसर्जन मिरवणुका असो वीज जाणार हे जणू ठरलेलेच असते.
((चौकट)))
पाऊस झाली की बत्ती गुल
गेल्या तीस-चाळीस दिवसांच्या खंडानंतर शुक्रवारी (ता.१८) जवळपास पहाटे तीनपासून शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरवात झाली. थोडासा पाऊस झाला, थोडे वारे सुटले की वीज जाते. हा तर मुसळधार पाऊस होता. पाऊस सुरू होताच काही वेळाने शहराच्या पूर्व भागात वीजपुरवठा खंडित झाला. महालक्ष्मी सणाची तयारी करीत असलेल्या किंवा झोपण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांना वाटले मुद्दाम पावसामुळे वीजपुरवठा बंद केला असेल; परंतु पाऊस कमी झाल्यानंतरही वीज आलीच नाही. प्रचंड उकाड्यात व डासांचा डंख सोसत काहींनी कशी बशी झोप घेत तर काहींनी रात्र अक्षरशः जागून काढली. सकाळी वीज आली तेव्हा नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, त्यांच्या आनंदावर लगेचच विरजण पडले.
दर पाच-दहा मिनिटाला ती जा-ये करीत होती.
------------
मॉन्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष
‘महावितरण’कडून मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे एजन्सीवर सोपवण्यात आली असून त्यामुळे अधिकारी, कर्मचारी नामानिराळे झाले आहेत. ही कामे अतिशय थातूरमातूर पद्धतीने उरकली जातात. त्यामुळे पावसाळ्यात अनेक रोहित्रांत वारंवार बिघाड होतो. रस्त्यावर झाडांच्या तारांत अडकलेल्या, ठिकठिकाणी लोंबकळलेल्या विद्युत वाहिन्यांकडेही दुर्लक्ष केल्या जाते. झाडांची कटींगही थातूरमातूर पद्धतीने केली जाते. फांद्या तोडल्यानंतर आठ-पंधरा दिवसांतच पुन्हा तारा त्यात अडकतात. त्यामुळे थोडे जरी वारे सुटले, पाऊस पडला तर विद्युत पुरवठा खंडित होतो. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.
-----