जिल्ह्यात एक लाखावर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
-----
व्याज व विलंब आकार माफ; सहा हप्त्यांत थकबाकी भरण्याची संधी
-----
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १९ ः वीजबिलांच्या थकबाकीमुळे महावितरणच्या परभणी मंडळातील तब्बल एक लाख ३१ हजार ९१ लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये एक लाख सात हजार ६२६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी, तर २३ हजार ४६५ ग्राहकांचा तात्पुरता खंडित आहे. या ग्राहकांकडे ३३४ कोटी ६६ लाख रुपयांची मूळ थकबाकी असून, १९८ कोटी ९५ लाख रुपयांचे व्याज आणि चार कोटी १८ लाख रुपयांचा विलंब आकार आहे. त्यामुळे एकूण थकबाकीचा आकडा ५३७ कोटी ७९ लाख रुपयांवर पोचला आहे.
महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना थकबाकी भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना सहा नोव्हेंबर ते १५ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या पात्र ग्राहकांना व्याज आणि विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे. तसेच १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकीच्या कालावधीनुसार २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते. ग्राहकांना मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरून उर्वरित रक्कम सहा समान, व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरण्याची सुविधाही देण्यात आली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्यांचे पुनर्जोडणी शुल्क माफ करण्यात येणार आहे.
---
जिंतूर विभागात सर्वाधिक पात्र ग्राहक
जिल्ह्यात जिंतूर उपविभागात सर्वाधिक २४ हजार ४६३ पात्र ग्राहक आहेत. त्याखालोखाल परभणी शहर, परभणी ग्रामीण आणि पूर्णा उपविभागांचा क्रमांक लागतो. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे. शेती व सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना वगळता पात्र ग्राहकांना महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा मोबाइल ॲपद्वारे अर्ज करता येणार आहे. कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यासाठी या योजनेला ग्राहकांकडून किती प्रतिसाद मिळतो, याकडे महावितरणचे लक्ष लागले आहे.