जिल्ह्यात यंदा पावसाची २३२.१ मिमी तूट
------------
-ऑगस्टमध्ये २५ ते ३० दिवसांचा पावसाचा खंड
-पिके संकटात, विहिरी-बोअरवेलची पातळी खोल
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ४ : जिल्ह्यात यंदा असमान पावसामुळे खरीप हंगाम संकटात आहे. जून महिन्यात पावसाची तूट राहिल्यानंतर जुलैअखेरीस झालेल्या पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र ऑगस्ट महिन्यात तब्बल २५ ते ३० दिवसांचा मोठा खंड पडल्याने जिल्ह्यात पिकांची अवस्था बिकट आहे. अत्यल्प पावसामुळे अनेक मंडळांत पिके हाती लागण्याची शक्यता धूसर झाली आहे.
जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ५९२.३ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात केवळ ३६०.२ मिमी म्हणजेच अपेक्षित पावसाच्या ६०.८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल २३२.१ मिमी पावसाची तूट नोंदवली गेली. ऑगस्ट महिन्यात सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि गंगाखेड या तालुक्यांत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला. त्यामुळे या भागांतील पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतीसाठी विहिरी व बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. परिणामी अनेक ठिकाणी विहिरी, बोअरवेलची पातळी झपाट्याने खालावत आहे. काही ठिकाणी त्यांनी तळ गाठण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
--
चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
उर्वरित पावसाळ्यात दमदार पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनासाठी चारा, पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पेरणीपासून पीक व्यवस्थापनापर्यंत शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. उत्पादनाची चिन्हे कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
......