पावसाने पाठ फिरवली, भूजलानेही साथ सोडली !

पावसाने पाठ फिरवली, भूजलानेही साथ सोडली !
Published on: 
पावसाने पाठ फिरवली, भूजलानेही साथ सोडली! -परभणी जिल्ह्यावर जलसंकट गडद; चार तालुक्यांत पातळी पाच मीटरपेक्षा अधिक खोल गणेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १८ ः पावसाची अनियमितता, अपुरा पाऊस, भूजलाचा वाढता उपसा यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीची स्थिती चिंताजनक पातळीवर आहे. भूगर्भातील साठ्यात यंदा पावसाअभावी वाढच न झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ८६ निरीक्षण विहिरींच्या नोंदींच्या आधारे यंदा सप्टेंबरअखेर भूजल पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ४.२६ मीटरने खोल गेली आहे. सेलू तालुक्यात सर्वाधिक ७.७३ मीटरची घसरण नोंदविण्यात आली असून पाथरी, जिंतूर आणि गंगाखेड या तालुक्यांनाही मोठा फटका बसला आहे. त्यातच निम्न दुधना प्रकल्पातील साठा अत्यल्प असल्याने आगामी रब्बी हंगामासाठी सिंचनाचे नियोजन, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याबाबत चिंता वाढली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी सप्टेंबर महिन्यात निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून भूजल पातळीचा आढावा घेतला जातो. यंदाच्या पाहणीत पाण्याची स्थिती मागील काही वर्षांच्या तुलनेत खालावल्याचे निदर्शनास आले आहे. मागील पाच वर्षांत सप्टेंबर महिन्यात भूजल पातळीची सरासरी ३.६० मीटर होती. यंदा हे प्रमाण ७.८६ मीटरपर्यंत पोचले आहे. या तुलनेनुसार भूजल पातळी ४.२६ मीटरने खोल गेली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजल साठ्याची भरपाई होण्यासाठी पुरेसा, योग्य अंतराने पाऊस होणे महत्त्वाचे असते. मात्र पावसाचे असमान वितरण आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे अनेक भागांत भूजल पुनर्भरणावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, विहिरींची पातळी खोल जात असून त्याचा परिणाम शेती आणि दैनंदिन पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. तालुकानिहाय आकडेवारीत सेलू येथे भूजल पातळीतील सर्वाधिक घसरण नोंदली गेली आहे. या तालुक्यात पातळी १२.४६ मीटर खोल असल्याची नोंद असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत ७.७३ मीटरची घट झाली आहे. त्याखालोखाल पाथरी तालुक्यात ५.९५ मीटर, जिंतूर ५.५३ मीटर, तर गंगाखेडमध्ये ५.०२ मीटरने पातळी खालावली आहे. या चार तालुक्यांतील घट पाच मीटरपेक्षा अधिक असल्याने आगामी काळातील पाणी व्यवस्थापनाचे आव्हान अधिक गंभीर ठरू शकते. विशेष म्हणजे, जिंतूर तालुक्यात सर्वाधिक २० निरीक्षण विहिरींची तपासणी करण्यात आली. या निरीक्षणांतही भूजल पातळी घसरल्याचे आढळून आले आहे. --- ‘निम्न दुधना’च्या साठ्यात घट जिल्ह्यातील भूजल स्थितीबरोबरच प्रमुख जलस्रोतांतील उपलब्ध साठाही चिंतेचा विषय ठरत आहे. निम्न दुधना प्रकल्पात सध्या १७.६८ टक्के उपयुक्त साठा असल्याची नोंद आहे. मागील वर्षी याच दिवशी प्रकल्पातील उपयुक्त साठा ७५.०५ टक्के होता. म्हणजेच वर्षभरात साठ्याच्या प्रमाणात ५७.३७ टक्क्यांची घट झाली आहे. पावसाच्या कमतरतेचा परिणाम जलाशयांतील आवक, भूजल पुनर्भरण या दोन्हींवर होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर पिण्याचे पाणी, शेती आणि अन्य गरजा यांचा समतोल राखून करणे आवश्यक ठरणार आहे. --- रब्बी हंगामाच्या नियोजनाची कसोटी भूजल पातळीतील घसरण, प्रकल्पातील मर्यादित साठा लक्षात घेता रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. विहिरींवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाणी उपशासाठी अधिक खोलीपर्यंत जावे लागू शकते. याचा परिणाम पाणी उपसण्याचा खर्च, पिकांच्या सिंचन नियोजनावर होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यापूर्वी भूजल साठ्याची स्थिती सुधारली नाही, तर काही भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते. त्यामुळे केवळ पावसाची प्रतीक्षा न करता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. --- निर्बंधांची कडक अंमलबजावणी हवी भूगर्भातील अमर्याद उपसा रोखण्यासाठी निर्बंध घालण्याबरोबरच त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. पावसाचे पाणी साठविणे, शेततळी व जलसंधारणाच्या उपायांना प्रोत्साहन देणे, विहिरींच्या परिसरात पाणी जमिनीत मुरण्यासाठी व्यवस्था, पाण्याचा अपव्यय टाळणे यांसारख्या उपायांची गरज आहे. विशेषतः टंचाईची शक्यता असलेल्या तालुक्यांत स्थानिक पातळीवर उपलब्ध जलस्रोतांचा आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणारे नियोजन करावे लागणार आहे. भूजल पातळीतील घसरण ही आगामी पाणी व्यवस्थापनासाठी इशारा मानून प्रशासन, शेतकरी, नागरिकांनी पाणी वापराबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com