पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज
Published on: 
परभणीत पाण्याचा अपव्यय, गळतीही ----------- मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ४ ः दुष्काळसदृश परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता नागरिकांकडून होणारा अनावश्यक पाण्याचा वापर, पाणीगळती रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. शहरातील अनेक भागांत नळाला पाणी आल्यानंतर बराच वेळ नळ सुरूच ठेवला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. घरासमोरील चारचाकी व दुचाकी वाहने धुणे, घरांच्या भिंती तसेच रस्ते धुण्यासाठी पाण्याचा मारा करणे, परिसरातील धूळ कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी वापरणे, असे प्रकारही अनेक ठिकाणी सुरू आहेत. पाण्याची गरज आणि उपलब्धता लक्षात घेता अशा अनावश्यक वापरावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नळाला पाणी आल्यानंतर गरजेपेक्षा अधिक वेळ नळ सुरू ठेवण्याची सवय अनेक नागरिकांमध्ये दिसून येते. पाणी भरल्यानंतर नळ तातडीने बंद करणे, घरातील गळणारे नळ दुरुस्त करणे आणि आवश्यक तेवढेच पाणी वापरणे, याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. पिण्यासह दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेले पाणी वाहन धुणे, घरासमोरील परिसर किंवा रस्ते धुणे यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरणे टाळले पाहिजे. विशेषतः पाणीटंचाईच्या काळात अशा वापरावर निर्बंध आणणे आवश्यक आहे. बाजारपेठेतही दुकानासमोरील धूळ कमी करण्यासाठी पाण्याचा अतिवापर होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. --- गळतीकडे दुर्लक्ष नको नळांना तोट्या नसणे, खराब नळातून सतत पाणी वाहत राहणे किंवा पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत गळती होणे यामुळेही मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. अशा गळतीची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाने विशेष पथके कार्यरत करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी किंवा घराजवळ पाण्याची गळती आढळल्यास ती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. --- जनजागृती, दंडात्मक कारवाईची गरज पाणी बचतीबाबत नागरिकांत जनजागृती करणे आवश्यक असले तरी केवळ आवाहन करून अपव्यय थांबणार नाही. वारंवार अनावश्यक पाणी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. पाणीगळती, अनधिकृत वापर आणि सार्वजनिक पाण्याचा गैरवापर यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त करावीत. पाणी ही मर्यादित, अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने गरजेपुरतेच पाणी वापरून त्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. प्रशासनानेही पाणीगळती, अनावश्यक वापर रोखण्यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना केल्यास उपलब्ध पाण्याचा अधिक काळ काटकसरीने वापर करता येईल. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com