पाथरी, मानवत, परभणी तालुक्यात
उद्यापासून दुष्काळ आढावा बैठका
-------------
आमदार राजेश विटेकर यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १६ : पाथरी विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची तपासणी करण्यासाठी बुधवारपासून (ता.१८) तालुकास्तरीय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या बैठकांत दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावनिहाय केलेल्या उपाययोजना, महसूल मंडळनिहाय विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. पाथरी, मानवत, परभणी तालुक्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट गावांतील सद्यस्थिती, पाणीटंचाई, शेतीविषयक समस्या, दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. प्रशासनाने यापूर्वीच दुष्काळ निवारणाचे आराखडे तयार केले आहेत. मात्र, संबंधित भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच यांच्या सूचनांनुसार गावपातळीवरील अडचणी जाणून घेऊन अतिरिक्त कोणती कामे हाती घेणे आवश्यक आहे. याबाबतही बैठकीत विचारविनिमय करण्यात येणार आहे. या बैठकांना पाथरी व परभणी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जयकवाडी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, जलसंधारण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, सहायक निबंधक, पशुवैद्यकीय अधिकारी, महावितरणचे उपअभियंता आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुष्काळाशी संबंधित समस्या आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच यांनी सविस्तर लेखी निवेदने घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार विटेकर यांनी केले आहे. सोनपेठ तालुक्यातील दुष्काळ आढावा बैठक या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
….
बैठकांचे वेळापत्रक असे
परभणी येथे बुधवारी (ता. १८) दुपारी १ वाजता बी. रघुनाथ सभागृहात बैठक होईल. गुरुवारी (ता.१९) सकाळी १० वाजता अंजली मंगल कार्यालय पाथरी येथे, तर दुपारी २ वाजता रेणुका मंगल कार्यालय मानवत येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
---------------