दूरदृष्टी पाथरीचा विकास साधू शकते.

दूरदृष्टी पाथरीचा विकास साधू शकते.
Published on: 
दीपोत्सव लेख परभणी... ------------------- पाथरीच्या सर्वंकश विकासासाठी हवी दूरदृष्टी ----------------- पाथरी तालुका हा संत श्री साईबाबांची जन्मभूमी म्हणून देशभर ओळखला जातो. धार्मिक महत्त्व आणि जीवनवाहिनी गोदावरी नदीचा समृद्ध वारसा, सुपीक जमीन, सिंचनाची उपलब्धता, राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे जाळे ही या तालुक्याची बलस्थाने मात्र या नैसर्गिक, भौगोलिक संपत्तीचा नियोजनबद्ध वापर अद्याप झालेला नाही. थोडा है थोडेकी जरूरत है या उक्तीप्रमाणे योग्य नियोजन, दूरदृष्टी, लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीचा मेळ साधला तर पुढील दशकात हा तालु‌का मराठवाड्यातील प्रगत कृषी औद्योगिक तालुका म्हणून उदयास येऊ शकतो. ---------- परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील ४९ हजार ९१२ हेक्टर लागवड क्षेत्रापैकी जवळपास ३६ हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यामुळे सिंचनाखाली आले. गोदावरी नदीचा ७४ किलोमीटरचा किनारा तालुक्यास लाभला आहे. त्यातच ढालेगाव, तारुगव्हाण, मुदगल येथील गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांमुळे तालुक्याची सिंचन क्षमता आणखी वाढली. ऊस, कापूस, सोयाबीन यांसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, हवामानातील अनिश्चितता, अधिकचा पाऊस किंवा दुष्काळ, कालव्यांची दुरवस्था, अपुरे पाणी व्यवस्थापन यामुळे शेतीचे गणित अनेकदा बिघडते. आज ज्या कालव्यांनी ३६ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी द्यायचे होते, तेच कालवे अनेक ठिकाणी दुरवस्थेमुळे केवळ १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित झाले आहेत. त्यामुळे कालव्यांचे आधुनिकीकरण, शेतातील एफसीपर्यंत नव्याने पाणी व्यवस्थापन हा विकासाचा पहिला टप्पा ठरला पाहिजे. पाथरीत ऊस, कापूस आणि सोयाबीनचे भरघोस उत्पादन होते. मात्र दोन साखर कारखाने सोडले तर या उत्पादनावर प्रक्रिया करणारे इतर उद्योग तालुक्यात जवळपास नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना आपला माल कच्च्या स्वरूपात व्यापाऱ्यांकडे विकावा लागतो. त्यातून खरा नफा मध्यस्थांकडे जातो. तालुक्यात आधुनिक कापूस प्रक्रिया उद्योग, जिनिंग प्रेसिंग, सूतगिरण्या, खाद्यतेल प्रकल्प, सोयाबीन प्रक्रिया उद्योग, जैवइंधन प्रकल्प, दुध व्यवसाय व फळ पिकांकडे स्थानिक शेतकऱ्यांना वळवून दुग्ध प्रक्रिया केंद्रे, फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग उभारले तर हजारो स्थानिक युवकांना रोजगार मिळू शकतो. शेतमालाला मूल्यवर्धन मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्नही लक्षणीय वाढेल. ------------- ‘एमआयडीसी’ची आवश्यकता पाथरीतील अनेक तरुण आज रोजगारासाठी छत्रपती संभाजीनगर, पुणे, चाकण, नाशिक, मुंबई किंवा इतर औद्योगिक भागाकडे स्थलांतर करतात. कारण स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. राष्ट्रीय महामार्गक्र. ६१, राष्ट्रीय महामार्ग ५४८-बीआणि राज्य महामार्ग ६१ मुळे पाथरीची राज्यातील प्रमुख बाजारपेठांशी उत्तम जोडणी झाली आहे. या भौगोलिक स्थानाचा लाभ घेत स्वतंत्र ‘एनआयडीसी’ उभारली तर कृषीपूरक उद्योग, वेअरहाऊस, लॉजिस्टिक पार्क, कोल्ड स्टोअरेज, पॅकेजिंग उद्योग आणि लघुउद्योगांना मोठी चालना मिळू शकते. ------------------ गोदापट्ट्यात हवे मजबूत रस्ते तालुक्यातील अनेक गावांपर्यंत मुख्य रस्ते असले तरी शेत शिवारातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे शेतमाल बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. अनेक भागांत पाणी असूनही रस्त्याअभावी आधुनिक व नगदी पिकांकडे शेतकरी वळले नाहीत. प्रत्येक शेतापर्यंत बारमाही शेतरस्ते, गोदावरी किनारी भागात दर्जेदार रस्त्यांचे जाळे, गावागावांना दर्जेदार संपर्क रस्ते ही भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरू शकते. -------------- साखर उद्योगाची क्षमतावाढ हवी तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. मात्र, उसाचे उत्पादन गाळप क्षमतेपेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांना इतर तालुक्यांत ऊस पाठवावा लागतो. वाहतूक खर्च, उशिरा गाळप आणि आर्थिक नुकसानयाचा फटका बसतो. विद्यमान कारखान्यांची गाळप क्षमता वाढवणे, इथेनॉल, वीजनिर्मिती, प्रेसमड व बायोगॅससारखे पूरक उद्योग उभारणे आणि उसावर आधारित उद्योगसाखळी विकसित करणे आवश्यक आहे. ---------- धार्मिक पर्यटनास मोठ्या संधी संत श्री साईबाबांची जन्मभूमी ही पाथरीची सर्वांत मोठी ओळख आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे भेट देतात. मात्र, जन्मभूमी मंदिर विकास आराखडा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जन्मभूमी मंदिराचा सर्वंकष विकास, भाविकांसाठी सुविधा, आध्यात्मिक पर्यटन सर्किट, गोदावरी पर्यटन, गुंजसह तालुक्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा विकास झाला तर पर्यटनातूनही रोजगार मिळू शकतो. हॉटेल, वाहतूक, हस्तकला, स्थानिक उत्पादने आणि सेवा क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. ------------------ शिक्षण-कौशल्य विकासावर भर भविष्यातील पाथरी घडवायची असेल तर केवळ शेती, उद्योग पुरेसे ठरणार नाहीत. आधुनिक अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषी तंत्रज्ञान केंद्र, कौशल्य विकास संस्था, आयटीआयचे आधुनिकीकरण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, महिला उद्योजकता प्रशिक्षण केंद्र, स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर उभारण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण मिळाले तर स्थलांतर कमी होईल. ----------------- जलव्यवस्थापन हेच भविष्याचे यश पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीपर्यंत पोचविण्यासाठी कालव्यांचे अस्तरीकरण, बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठा, उच्च पातळी बंधाऱ्यांवरून लिफ्ट सिंचन योजना, सूक्ष्म सिंचनाचा व्यापक वापर, जलसंधारण, शेततळ्यांचे जाळे उभारणे हि काळाची गरज आहे. पाण्याचे नियोजन झाले तर उत्पादन वाढेल, पीकपद्धती बदलेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढू शकते. शिवाय आधुनिक कृषी बाजार, ई-नाम युविद्या, शीतगृहे, सौरऊर्जा प्रकल्प, ग्रामीण बीपीओ, डिजिटल सेवा केंद्रे, कृषी ड्रोनसेवा, स्मार्ट ग्राम संकल्पना आणि ई-गव्हर्नन्स यांचा विस्तार झाला तर पाथरी विकासाच्या नव्या युगात प्रवेश करू शकते. ------------ लोकप्रतिनिर्धीसाठी सुवर्णसंधी आज पाथरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार राजेश विटेकर करत आहेत. तसेच पाथरी शहरातील भूमिपुत्र आमदार सईद खान विधान परिषदेत प्रतिनिधित्व करत आहेत. पंचायत नेतृत्वाला संधी मिळाली आहे. सत्तेतील या प्रतिनिधींनी राजकारणापलीकडे जाऊन पाथरीसाठी एकत्रित दीर्घकालीन विकास आराखडा तयार केला तर अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागू शकतात. पुढील दशक हे पाथरीसाठी विकासाचे, परिवर्तनाचे दशक ठरू शकते. त्यासाठी दूरदृष्टी,नियोजन आणि सामूहिक इच्छाशक्ती या तीन गोष्टीची सर्वाधिक आवश्यकता आहे. ----------------- विकासाचे नवे स्वप्न पाथरीकडे सुपीक जमीन आहे, मुबलक पाणी आहे, धार्मिक वारसा आहे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांची जोडणी आहे. कष्टाळू शेतकरी व होतकरू युवक ही मोठी ताकद आहे. गरज आहे ती या सर्व शक्ती एकत्र आणणाऱ्या नियोजनाची शेतीला उद्योगांची जोड, उद्योगांना पायाभूत सुविधा, पर्यटनाला आधुनिक विकास आणि युवकांना रोजगार मिळाला तर पाथरी तालुका संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचा आदर्श ठरू शकतो. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.