पाथरीत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर
---------
सेलूहून माजलगाव, अंबड, परळीकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळविण्याची गरज
पाथरी,ता.१३ (बातमीदार)ः शहरातून जाणाऱ्या दोन राज्य व एका राष्ट्रीय महामार्गांवरील वाढत्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर महामार्गाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाहनचालकांसह पादचारी, स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सेलू येथून माजलगाव, अंबड, परळीच्या दिशेने जाणारी जड व लांब पल्ल्याची वाहतूक बायपास मार्गाने वळविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नांदेड-पैठण (राज्य मार्ग ६१), देवगाव फाटा ते परळी (राज्य मार्ग (५४८ ब) या मार्गावरील वाहतुकीसह निर्मल-कल्याण राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक पाथरी शहरातून जात असल्याने रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत आहे. विशेषतः जड वाहने, मालट्रक, ट्रॅक्टर, इतर लांब पल्ल्याची वाहने शहराच्या मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करीत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावत आहे. अनेकवेळा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यात शहरातील महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने रस्त्यांची उपलब्ध रुंदी कमी होत आहे. दुकाने, हातगाड्या, रस्त्यालगतच्या इतर अडथळ्यांमुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
((चौकट))))
पादचारी,विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास
या कोंडीचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. गर्दीच्या वेळी वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
---------------
बायपासच ठरू शकतो पर्याय
सेलू येथून माजलगाव, अंबड, परळीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना शहरातून जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी खेडुळा अथवा बोरगव्हाण येथून बायपास मार्ग विकसित करण्याची मागणी पुढे येत आहे. यामुळे शहरातून जाणारी बाहेरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविता येऊ शकते. परिणामी शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होऊन स्थानिक नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रवासाचा वेळ वाचण्यासोबतच अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासही हातभार लागू शकतो.
-----------------
((चौकट)))
नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची
शहराच्या विकासासाठी रस्ते महत्त्वाचे असले तरी नागरिकांची सुरक्षितता त्याहूनही अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता बायपास मार्गाचा प्रश्न आता तरी प्राधान्याने मार्गी लावण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.
----------------