घोटाळ्याचा आरोप निराधार ः जाधव
पाटोदा ः पाटोदा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप नगराध्यक्षा दिपाली जाधव यांनी फेटाळला आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना त्या म्हणाल्या, योजनेसाठी जीएसटीसह ८० कोटी ४२ लाख रुपये मंजूर झाले आहेत, त्यामुळे १०० कोटींचा गैरव्यवहार हा केवळ वैयक्तिक द्वेषातून केलेला आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून लाजेश्वर ते पाटोदा अशी २७ किमीची योजना मंजूर झाली असून, फेब्रुवारी २०२७ पर्यंत शहरात पाणी पोहोचेल. यावेळी उपनगराध्यक्ष, गटनेते, सभापती आणि पदाधिकारी उपस्थित होते.
-----
‘प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करा’
बीड ः शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन, संत गजानन महाराज मंदिर परिसरातील प्रलंबित विकासकामे तात्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्याकडे केली आहे. अशोक हिंगे, सुहास पाटील आणि विशाखा ढोले यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे रस्ते आणि इतर सुविधांची कामे अपूर्ण असल्याने शालेय विद्यार्थी आणि मुलांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले. मुख्याधिकारी मांडुरके व उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
-----
राज्य लोकसेवा हक्क कायद्याची
प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त
बीड ः नागरिकांना विहित वेळेत शासकीय सेवा मिळवून देण्यासाठी आणि प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, हरिश धार्मिक, शिवकुमार स्वामी, प्रभोदय मुळे उपस्थित होते. कार्यालयात चांगली आसनव्यवस्था असावी व डिजिटल प्रमाणपत्र तात्काळ मिळावे, असे डॉ. जाधव म्हणाले. शिवकुमार स्वामी यांनी कायद्याची माहिती दिली, तर विवेक जॉन्सन यांनी अंमलबजावणीचे निर्देश दिले.
------
‘सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये
गरजू घटकांना प्राधान्य द्या’
बीड ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १४, १५, ३० व ३१ डिसेंबर रोजी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. यात नवदांपत्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असून, ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर आणि गरजू कुटुंबांना प्रामुख्याने सामावून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. बैठकीत जितीन रहेमान, प्रदीप भोगले, एफ. एम. शेख, कालिदास बडे आणि केदार गरड उपस्थित होते. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी गावोगावी भेटी देऊन जनजागृती करावी आणि अंगणवाडी सेविकांनी इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज तातडीने सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.