Aurangabad : ओला दुष्काळ अन् दिवाळीत शेतकरी भरडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crop Damage

Aurangabad : ओला दुष्काळ अन् दिवाळीत शेतकरी भरडला

फुलंब्री : शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा असून त्यांनी पिकविलेल्या अन्नधान्यावर जग सुरू आहे. मात्र, गत तीन-चार वर्षांपासून कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ आणि दिवाळी याचे समीकरण सातत्याने राहिले आहे.

त्यामुळे यावर्षी ओला दुष्काळ आणि दिवाळीत शेतकरी भरडला जात असून दिवाळीच्या सणाला गोडधोड पिकविलेला कापूस काळा पडल्याने शेतकऱ्याची दिवाळी यावर्षीही धुमधडाक्यात होणार नाही हे निश्चित आहे.

यावर्षीचे संपूर्ण मका पीकही पाण्यात गेल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ग्रामीण भागात आजही शेतीवरच शेतकऱ्यांची उपजीविका सुरू आहे शेतीच्या माध्यमातून पिकविलेल्या अन्नधान्यावरच त्यांची मदार असल्याने दैनंदिन खर्चही यामध्ये त्यांना भागवावा लागतो. शेतीला जोड धंदा म्हणून करण्यात येणाऱ्या दुग्ध व्यवसाय आता डळमळीत असून दुधाला योग्य भाव नसल्याने चारही बाजूने शेतकरी अडचणीत सापडू लागला आहे.

ऐन दिवाळीच्या सणांमध्ये शेतकऱ्यांना अन्नधान्य पिकवताना मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहे. खरिपात लागवड केलेली मका पीक दिवाळीपूर्वी सोंगणीला आल्याने तालुक्यातील सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी मका पीक सोंगणी करून टाकलेले आहे.

परंतु मका पिकाची सोंगणी झाल्यानंतर सातत्याने सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला आहे. मागील गेल्या चार ते पाच महिन्यापासून एका बियाणाचे रूपांतर जास्त दाण्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी सातत्याने पिकाची मुलाबाळाप्रमाणे निगा राखलेली आहे. यावर्षी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांची क्षमता चांगली होती.

परंतु सोंगणी केल्यानंतर शेतात असणाऱ्या मकाचे कणीस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पाण्यात तरंगताना दिसून आले. त्यामुळे आजही अनेक भागातील मका पिकांना कोंब फुटू लागले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

त्याचबरोबर मकाचे पीक तर गेलेच पण कपाशी पीकही आता चांगले भरले होते. परंतु थोड्याफार प्रमाणात असणारा कापूस विकून शेतकरी दिवाळी साजरी करण्याचा विचार करीत होता. परंतु यावर्षी सुरू असलेल्या पावसामुळे कपाशीचे बोंडेही काळे पडले असून कापूस ही काळपटला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून यावर्षीची अनेक शेतकरी दिवाळी साजरी करणार नसल्याचे चित्र आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज

-सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाची दाणादाण झाली आहे. यात प्रामुख्याने मका पीक पूर्णपणे वाया गेले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मकाची कणसे पाण्यात तरंगताना दिसून आली.

परिणामी त्या दाण्यालाही आता कोंब फुटू लागले आहे. तर काही मका पूर्णपणे वाया गेल्याने कपाशीवर शेतकऱ्यांची मदत होती. परंतु कपाशी पिकावरील आता सततच्या पावसाचा परिणाम जाणवू लागला असून कपाशीच्या कैऱ्या काळ्या पडून गळून पडू लागल्या आहे. त्याचबरोबर कपाशीच्या झाडाला आलेल्या काही प्रमाणात कपाशीची बोंडे काळवटली आहे. त्यामुळे खरिपातील प्रमुख पिके समजली जाणारी मका व कपाशी वाया जात असल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी किमान ७५ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी बळिराजा करीत आहे.