पिंपळगाव डोळ्यात कचरा डेपोला ग्रामस्थांचा विरोध
कळंब, ता. ३१ (बातमीदार) : तालुक्यातील पिंपळगाव डोळा येथील गायरान जमिनीवर कळंब नगर परिषदेचा कचरा डेपो उभारण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित कचरा डेपोतून परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्यास ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कळंब-ढोकी मार्गावरील पिंपळगाव डोळा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पिंपळगाव डोळा येथील गायरान वस्तीमध्ये सुमारे १५० ते २०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर तसेच बोअरवेल गायरान जमिनीच्या परिसरात आहेत. या ठिकाणी कचरा डेपो उभारल्यास कचऱ्यातून झिरपणारे दूषित पाणी विहीर आणि बोअरवेलमध्ये मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
संबंधित गायरान जमिनीपैकी काही क्षेत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने आणि ग्रामसभेच्या सहमतीने महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्र तसेच सौरऊर्जा प्रकल्पासाठी देण्यात आले आहे. त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस, लिंबराज टेकाळे, सुंदर टेकाळे, सौदागर जगताप, संदीप बारगुले, संकेत दत्त, परसराम टेकाळे, ज्ञानेश्वर जगताप, अभय गुजर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.