प्लॅस्टिकबंदी कागदावरच!
सहा दुकानदारांना २३ हजारांचा दंड; कारवाई थंडावताच वापर सुरू
-----
धाराशिव, ता. ११ (बातमीदार) : शहरातील रस्त्यांवर आणि कचराकुंड्यांजवळ साचलेल्या कचऱ्यात प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पालिकेने काही दिवसांपूर्वी प्लॅस्टिकविरोधी मोहीम राबवून कारवाई केली होती. मात्र, ही मोहीम थंडावताच प्लॅस्टिकचा वापर पुन्हा सुरू झाला.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि अन्य प्लॅस्टिकजन्य वस्तू मोठ्या प्रमाणात आढळतात. पालिकेकडून कचरा उचलला जात असला, तरी तो उघड्यावर पडून असताना वाऱ्यामुळे प्लॅस्टिक नाल्यांमध्ये वाहून जाते. तसेच रस्त्यालगतच्या झुडपांच्या फांद्यांमध्ये अडकलेले प्लॅस्टिकही नंतर नाल्यांत पडते. शहरातील बहुतांश रस्त्यांच्या कडेला अशीच परिस्थिती दिसून येत आहे.
-----
प्लॅस्टिकचा वाढला वापर
शहर पलॅस्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने गेल्या महिन्यात विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेदरम्यान पथकाने विविध बाजारपेठांतील दुकानांची अचानक तपासणी केली. काही दुकानदार ग्राहकांना साहित्य देण्यासाठी प्रतिबंधित प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत असल्याचे आढळले. त्यानंतर सुमारे २५० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले, तर सहा दुकानदारांकडून २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते.
-----
घंटागाडी असूनही कचरा रस्त्यावर
कचरा संकलनासाठी पालिकेची घंटागाडी थेट घरापर्यंत येत असतानाही काही नागरिक कचरा घंटागाडीत न टाकता रस्त्याच्या कडेला उघड्यावर फेकत आहेत. या कचऱ्यात प्लॅस्टिकच्या कॅरिबॅग आणि अन्य प्लॅस्टिकजन्य वस्तूंचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत आहे.
-----
OSM26B07155
धाराशिव : शहरातील रस्त्यालगत साचलेला कचरा.