
सिडकोतील एका शाळेत मुलींशी रिक्षाचालक, व्हॅनचालकाकडून अश्लील वर्तन केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येताच स्वतः पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता थेट रस्त्यावर उतरले.
औरंगाबाद - शाळा, महाविद्यालयातील आतली परिस्थिती तुम्ही सांभाळा, ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नका, परिसरात सीसीटीव्ही बसवा, सुरक्षारक्षकांची नेमणूक करा, कॅम्पसच्या बाहेरची परिस्थिती आम्ही हाताळतो, अशा सूचना पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शाळा, महाविद्यालयातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकांना केल्या.
सिडकोतील एका शाळेत मुलींशी रिक्षाचालक, व्हॅनचालकाकडून अश्लील वर्तन केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येताच स्वतः पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता थेट रस्त्यावर उतरले आणि त्यांनी १५ डिसेंबररोजी विविध शाळा, महाविद्यालये आणि परिसरात शाळा सुटण्याच्या वेळेत भेटी देत सूचना केल्या. विशेष म्हणजे आयुक्तांनी रिक्षा, व्हॅनचालक, शिक्षक, विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
गुरुवारी दुपारी डॉ. गुप्ता हे सरस्वती भुवन प्रशालेसमोर थांबले. त्याचवेळी शाळेची पहिली शिफ्ट सुटल्यामुळे विद्यार्थ्यांसह रिक्षा व व्हॅनची गर्दी झाली होती. गुप्ता यांनी शिक्षकांशी संवाद साधला. शाळेत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत का?, विद्यार्थ्याला ओळखपत्र दिले का? सुरक्षारक्षक नेमले का?, शाळेच्या आवारात टवाळखोर मुले फिरतात का?, रिक्षा व व्हॅनचालकांचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता शाळेने घेतलेला आहे का?, मुलींच्या तक्रारी कशापद्धतीने सोडविल्या जातात? दामिनी पथक आणि संबंधित पोलिस ठाण्याचे व पोलिस अधिकाऱ्यांचे नंबर घेतलेले आहे का? याबद्दलची माहिती विचारली.
केस वाढविलेले दिसताच बसविले व्हॅनमध्ये
वडापावच्या दुकानाबाहेर रस्त्यावर येताच पोलिस आयुक्तांनी केस वाढविलेल्या मुलाला पकडले. तू कॉलेजमध्ये आहेस का? इथे कशाला आलास, असे म्हणून त्याच्या डोक्यावरील केस पकडले, गळात साखळी, बेल्ट पाहताच त्याला गाडीत बसवले.
रिक्षा येईपर्यंत होतो टवाळखोरांचा त्रास
पोलिस आयुक्तांनी मुलींशी संवाद साधला. तुम्हाला कोणी त्रास देते का? रिक्षा व व्हॅनचालकांकडून त्रास होतो का? अशी विचारणा करताच मुलीने सांगितले की, व्हॅन, रिक्षाचालकांकडून त्रास होत नाही. मात्र शाळेच्या परिसराबाहेर उभे राहिल्यानंतर व्हॅन, रिक्षाला येण्यास उशीर झाला तर टवाळखोर मुले वाहनांवर बसून मुलींकडे पाहून कमेंट करीत असल्याचे सांगितले. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर मात्र टवाळखोर मुले आपल्या वाहनांवर बसून जोरजोरात बोलतात, हसतात, मुलींकडे पाहून विचित्र हावभाव करतात अशी तक्रार शिक्षकांनी केली. सरस्वती महाविद्यालयाच्या दुसऱ्या बाजूला मुख्य रस्त्यालगत असलेल्या वडापाव दुकानात पोलिस आयुक्त गेले. त्यांनी दुकानदाराला टवाळखोर पोरांना बसू देऊ नकोस, पायऱ्यावर मुले बसलेली असतात अशी तक्रार असल्याचे सांगताच दुकानदाराने पायऱ्या काढून टाकल्या असून मुले बसू नये म्हणून ऑइल टाकले असल्याचे सांगितले. गुप्ता यांनी त्याचीही पाहणी केली.
तो म्हणाला बीए करतो, विषय सांग म्हणताच म्हणाला ‘बायोलॉजी’
महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या एका विद्यार्थ्याला आयुक्तांनी इथला विद्यार्थी आहेस का, असे विचारताच त्याने ‘मी बीएमध्ये शिक्षण घेत असून ओळखपत्र आणले नसल्याचे म्हणाला. त्यावर आयुक्तांनी बीएचे विषय सांग म्हणताच विद्यार्थ्याने इंग्रजी, हिंदी, राज्यशास्त्र, बायोलॉजी असे सांगताच याला वाहनात बसवा असे फर्मान आयुक्तांनी सोडले. आणखी एका विद्यार्थ्याला ओळखपत्र दाखव म्हणताच त्याने स्वत:चा फोटो न चिटकविलेले ओळखपत्र दाखविले. दरम्यान आयुक्तांनी सरस्वती भुवनचा परिसरातील मैदानासह कोपरा न कोपरा पिंजून काढला.
ऑडिटोरियमच्या पायऱ्यांवर बसलेल्या मुलामुलींनी आयुक्तांना पाहताच धूम ठोकली, तर काहींनी गेटवरून उड्या मारल्या. चिकलठाणा येथील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले विद्यालय शाळा गाठली. शाळेतून आलेल्या तक्रारीबद्दल विचारताच शाळेचे शिक्षक म्हणाले, होय साहेब, मी तक्रार केली होती. शाळा सुटल्यानंतर दोन्ही बाजूंनी टवाळखोर मुले उभे राहतात व मुलींकडे पाहून विचित्र हावभाव करतात. नंतर पोलिस आयुक्तांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.