LTR17HTP04.jpg लातूर ः पोलिस विभागातील चालकांचा गौरव करताना पोलिस अधीक्षक अमोल तांबे.
---
पोलिस अधीक्षकांकडून चालकांच्या कार्याचा गौरव
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १७ ः पोलिस दलाच्या कार्यक्षमतेमध्ये वाहनचालकांची भूमिका महत्त्वाची आहे. दिवस-रात्र कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या चालकांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे. याच भावनेतून चालक दिनानिमित्त पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी कार्यालयातील मोटार परिवहन विभागाच्या चालकांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला.
यावेळी त्यांनी चालकांशी संवाद साधला. यावेळी चालकांच्या दैनंदिन कामकाजाचे, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि पोलिस विभागाच्या कार्यात असलेल्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
पोलिस दलामध्ये अधिकारी व अंमलदार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारची कर्तव्ये पार पाडत असतात. या सर्व कामकाजामध्ये पोलिस वाहनचालकांची भूमिका ही पडद्यामागील; परंतु महत्त्वाची असते. पोलिस अधिकारी व अंमलदारांना वेळेत आणि सुरक्षितपणे घटनास्थळी पोचविणे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वाहन उपलब्ध करून देणे, तसेच विविध तपास व कारवाईसाठी पोलिस पथकांना आवश्यक त्या ठिकाणी घेऊन जाणे, ही जबाबदारी चालक सातत्याने पार पाडत असतात. त्यामुळे त्यांचा हा गौरव करण्यात आला असल्याचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी यावेळी नमूद केले.