ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून गावोगावी रात्रीची गस्त!
-----
२७९ गावांना भेटी देत पोलिसांनी साधला १४ हजार नागरिकांशी संवाद
-----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २४ ः पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या विविध समस्यांचा सामना करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २७९ गावांना भेटी देऊन १४ हजार २२ नागरिकांशी पोलिसांनी प्रत्यक्ष संवाद साधला आहे.
नागरिक आणि पोलिस यांच्यातील समन्वय वाढविण्यासोबतच गावपातळीवरच संभाव्य समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर या उपक्रमात भर देण्यात येत आहे. ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून गावोगावी रात्रीची गस्त आता सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनजीवन, शेती, पशुधन आणि नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या समस्यांचा वेळीच अंदाज घेऊन त्यांचा सामना करण्यासाठी नागरिकांना सज्ज करणे, तसेच ग्रामीण भागातील सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
--
गावोगावी प्रत्यक्ष संवाद
‘पोलिस आपल्या गावामध्ये’ या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी व अंमलदार गावांना प्रत्यक्ष भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान ग्रामस्थ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. आगामी काळात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोणत्या स्वरूपाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात, त्याचा नागरिकांच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
-----
गावाच्या सुरक्षिततेला बळ
या उपक्रमात गावातील सामाजिक भान असलेल्या, होतकरू आणि उत्साही तरुणांचा ग्रामसुरक्षेसाठी सहभाग वाढविला जात आहे. ज्या गावांना पोलिसांनी भेटी दिल्या आहेत, त्या गावांमध्ये स्थानिक तरुणांच्या सहकार्याने ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे. रात्रीच्या वेळी गस्त घातली जात आहे. लोकसहभागातून प्रतिबंधात्मक उपाययोजनावर भर दिला जात आहे.
-------
((कोट))
पोलिस आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून गावाची सुरक्षितता अधिक बळकट होऊ शकते. हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. लोकसहभाग, सामाजिक जबाबदारी आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गाव अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पोलिस दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
- अमोल तांबे, पोलिस अधीक्षक