पोलिस कर्मचाऱ्याकडून मेहुण्यास मारहाण
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः बहिणीच्या घरात झालेल्या कौटुंबिक वादातून पोलिस कर्मचाऱ्याने डॉक्टर असलेल्या मेहुण्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (ता.१२) सिडको एन-६ (बजरंग चौक) येथे घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या भाच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गणेश दिनकर घोरपडे (रा. अयोध्यानगर), यश राजेश भालेराव (रा. नक्षत्रवाडी) आणि डॉक्टरची पत्नी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
याप्रकरणी डॉ. राजू उत्तमराव लोंखडे (वय ४३) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, त्यांनी पत्नीकडे अंदाजे एक ते दीड लाख रुपये ठेवण्यासाठी दिले होते. याबाबत विचारणा केली असता, पत्नीने पैसे आईकडे दिल्याचे सांगितले. डॉक्टरने पैशांची मागणी केली असता, पत्नीने भावाला आणि भाच्याला घरी बोलावले. यानंतर ग्रामीण पोलिस दलात असलेल्या गणेश याने ‘‘तुम्ही माझ्या बहिणीकडे कशासाठी पैसे मागता,’’ असे म्हणत शिवीगाळ, मारहाण केली. तसेच एका आरोपीने लाकडी दांड्याने डोळ्यावर आणि कानावर वार करून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता ‘‘मी पोलिस आहे, तुझा दवाखाना बंद करीन,’’ अशी धमकी दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------