(लीड)
चार संवेदनशील गावांत आता पोलिस चौकी
पारध ठाण्याच्या हद्दीतील गावांना दिलासा; ग्रामस्थांची होणार वेळ, पैशांची बचत
धावडा, ता. ८ (बातमीदार) : भोकरदन तालुक्यातील पारध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धावडा, वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई आणि अन्वा या मोठी लोकसंख्या असलेल्या संवेदनशील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार पोलिस चौकी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे.
पोलिस संरक्षण चौकीसाठी संबंधित ग्रामपंचायतीने शासकीय जागा उपलब्ध करून दिल्यास तिचा वापर केला जाणार आहे. शासकीय जागा उपलब्ध नसल्यास खासगी जागा भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. त्याचे भाडे शासनाकडून थेट जागामालकाला दिले जाईल. त्यामुळे योग्य जागा उपलब्ध असलेल्या नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नव्याने सुरू होणाऱ्या प्रत्येक पोलिस संरक्षण चौकीत एक ते दोन पोलिस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात असणार आहेत. गावात २४ तास पोलिसांची उपस्थिती राहणार असल्याने अवैध धंदे, वादाचे प्रसंग आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होईल. तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था राखणे अधिक सुलभ होणार आहे. दरम्यान, यापूर्वी छोट्या-मोठ्या तक्रारी, भांडणे किंवा अदखलपात्र गुन्ह्यांच्या (एन.सी.) अर्जांसाठी ग्रामस्थांना अनेक किलोमीटरचे अंतर पार करून पारध पोलिस ठाण्यात जावे लागत होते. मात्र, आता पोलिस संरक्षण चौकीतच प्राथमिक तक्रारींची दखल घेतली जाणार असल्याने नागरिकांची पोलिस ठाण्यातील धावपळ कमी होणार आहे. परिणामी, सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत होणार आहे.
.................
कोट
पोलिस महासंचालकांच्या सूचनेनुसार पारध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धावडा, वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई आणि अन्वा या मुख्य व मोठी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पोलिस संरक्षण चौक्या सुरू करण्यात येत आहेत. ग्रामपंचायतींनी अथवा स्थानिक नागरिकांनी या चौक्यांसाठी मोकळी किंवा भाडेतत्त्वावरील जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे.
- सचिन खामगळ, सहायक पोलिस निरीक्षक, पारध ठाणे