२२ गावांना भेटी देऊन १ हजार ७५ नागरिकांशी संवाद

२२ गावांना भेटी देऊन १ हजार ७५ नागरिकांशी संवाद
Published on: 
२२ गावांना भेटी देऊन एक हजार ७५ नागरिकांशी संवाद पोलिस आपल्या गावामध्ये उपक्रम; दुष्काळसदृश परिस्थितीतील समस्यांवर चर्चा ----- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. २५ : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लातूर पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ या उपक्रमाला ग्रामीण भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमांतर्गत एका दिवसात जिल्ह्यातील २२ गावांना भेटी देऊन तब्बल १ हजार ७५ नागरिकांशी संवाद साधण्यात आला. नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासोबतच आगामी सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत उद्भवू शकणाऱ्या विविध समस्यांना सामूहिक प्रयत्नांतून सामोरे जाण्याचा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी दिला. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबविण्यात येत असून अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी कासार शिरशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हसुरी येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडखेड व हेर या गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मायने यांनी साकोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नळेगाव येथे ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. भेटींदरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, पाणीटंचाईच्या काळात घ्यावयाची खबरदारी, गावातील सुरक्षितता आणि संभाव्य गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. आगामी सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत पाणीटंचाई, शेतीविषयक अडचणी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या तसेच सुरक्षिततेशी संबंधित विविध आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, परस्परांना सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. ----- पोलिस अधीक्षकांकडून दररोज आढावा ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम केवळ गाव भेटीपुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या समजून घेणे, पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणे, गावातील सुरक्षितता वाढविणे आणि संभाव्य गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करणे, हा त्यामागील व्यापक उद्देश आहे. ग्रामस्थांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे तसेच गावाच्या सुरक्षिततेसाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारावी, यावर या उपक्रमात भर दिला जात आहे. विशेष म्हणजे पोलिस अधिक्षक तांबे या उपक्रमाचा दररोज आढावा घेत आहेत. ----- LTR26B15456 लातूर : ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ या उपक्रमाद्वारे ग्रामस्थांनी संवाद साधताना पोलिस अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com