अम्ब्रेला शेल्टर की शोभेच्या बाहुल्या?
पोलिस दलाचा खर्च पाण्यात; ११ प्रमुख चौकांत उभारलेल्या सुविधेकडे वाहतूक पोलिसांची पाठ
-----
लातूर, ता. १८ : शहरातील वाढती वाहतूक, प्रमुख चौकांतील कोंडी आणि भरधाव वाहनांच्या गर्दीत वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी पोलिस दलातर्फे शहरातील प्रमुख चौकांत ‘अम्ब्रेला शेल्टर’ उभारण्यात आले. मात्र, उद्घाटनानंतर या सुविधेचा वापरच होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेसाठी उभारलेले हे शेल्टर सध्या शोभेच्या वस्तू ठरत असून, त्यावर झालेला खर्च वाया गेल्याची चर्चा आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासोबतच वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रमुख चौकांत ही सुविधा उभारण्यात आली. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या उपस्थितीत १६ ऑगस्ट रोजी शेल्टरचे उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या वेळी पोलिसांनी त्याचा वापर केला आणि छायाचित्रेही काढण्यात आली. मात्र, त्यानंतर या सुविधेचा प्रत्यक्ष वापर होताना दिसत नाही. शेल्टरमध्ये उभे राहून वाहतूक नियमन करणारा एकही पोलिस कर्मचारी अद्याप दिसला नसल्याने या सुविधेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना शहरातील विविध चौक, सिग्नल आणि प्रमुख मार्गांवर रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. उन्हाची तीव्रता, पाऊस आणि बदलते हवामान अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना कर्तव्य बजावावे लागते. या कर्मचाऱ्यांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे आणि वाहतूक नियंत्रणाचे काम अधिक प्रभावीपणे करता यावे, या उद्देशाने अम्ब्रेला शेल्टर उभारण्यात आले होते. मात्र, पोलिसांकडूनच या सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असल्याने त्यांचा नेमका उपयोग कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-----
येथे आहेत ‘अम्ब्रेला शेल्टर’
- छत्रपती शिवाजी महाराज चौक
- राजीव गांधी चौक
- पीव्हीआर चौक
- नवीन रेणापूर नाका
- जुना रेणापूर नाका
- दयानंद गेट
- संविधान चौक
- अशोक हॉटेल चौक
- गरुड चौक
- गूळ मार्केट चौक
-----
लातूर : छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांसाठी उभारलेले अम्ब्रेला शेल्टर. वापराअभावी ही सुविधा धूळखात पडली आहे.