राज्यशास्त्र विभागाच्या चर्चासत्राचा समारोप
छत्रपती संभाजीनगर, ता. ११ : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी केवळ आर्थिक विकास पुरेसा नसून ज्ञानाधिष्ठित समाज, सक्षम शिक्षणव्यवस्था, गुणवत्तापूर्ण संशोधन, सुशासन, सामाजिक समावेशन आणि पर्यावरणपूरक विकास यांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी कुलगुरू प्रा. मनोज दीक्षित यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप माजी कुलगुरू डॉ. मनोज दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ‘रिव्हिजिटिंग पॉलिटिकल थॉट अॅण्ड इंडिजीनस पॉलिटी थ्रू द लेन्स ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचा सिफार्ट सभागृहात बुधवारी (ता. आठ) समारोप झाला. प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. धनश्री महाजन, विभागप्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोनदिवसीय चर्चासत्राचा विस्तृत अहवाल भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन परिषदेला पाठविण्यात येणार आहे, असे डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले. तर चर्चासत्रात संशोधक, विद्यार्थी, शिक्षक असे एकूण १४० जण सहभागी झाले. दोन दिवसांत प्रा. जे.के. बजाज, माजी कुलगुरू प्रा. संजीवकुमार शर्मा, प्रा. ब्रिजेंद्र पांडे, डॉ. विठ्ठल दहिफळे, डॉ. रमेश पांडव, प्रा. प्रशांत पौळ, डॉ. अनुसया नैन, डॉ. अश्विन रांजणीकर, प्रा. सुरेंद्र जोंधळे, प्रा. श्रीराम येरळकर, प्रा. मकरंद पैठणकर, प्रा. जितेंद्र वासनिक, प्रा. दत्तात्रय वाबळे, प्रा. सुधीर वाडेकर यांनी मार्गदर्शन केले.