प्रमोद खैरनार : सकाळ संवाद दिवाळी अंक

प्रमोद खैरनार : सकाळ संवाद दिवाळी अंक
Published on: 
रायझिंग मराठवाडा- प्रमोद खैरनार ------ क्रेडाई नॅशनलचे राष्ट्रीय सहसचिव प्रमोद खैरनार यांचे बांधकाम क्षेत्रातील योगदान सर्वश्रुत आहे. वर्ष २०२३ ते २०२५ दरम्यान क्रेडाई महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेल्या खैरनार यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर सुरवातीला अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला. त्यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाली होती; मात्र, त्यांना बांधकाम क्षेत्राचे ‘करिअर’ खुणावत होते. शेवटी आपली आवड आणि कल ओळखत बांधकाम क्षेत्रात काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या वाटचालीत बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचे उद्योजक म्हणून त्यांचे नाव पुढे आले. आजपर्यंत त्यांनी शहराला विविध भागांत गृहप्रकल्प दिले. अनेकांचे स्वप्नांतील घर प्रत्यक्षात उभारण्यात त्यांचा वाटा मोठा राहिलेला आहे. बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता, तांत्रिक कौशल्य आणि ग्राहकांचा विश्वास या आधारांवर काम केल्यास दीर्घकाळ यश मिळते, असा त्यांचा अनुभव आहे. ----- संभाजीनगर बनावे राहण्यायोग्य, आनंददायी -------------- छत्रपती संभाजीनगराचे औद्योगिक क्षेत्र आता गतीने विकसित होत आहे. त्यामुळे आता या क्षेत्राने समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम केले पाहिजे. आज आपण शहर बांधत नाही, तर पुढच्या पिढ्यांचे भविष्य घडवत आहोत. त्यामुळे शहराचा विकास विभागनिहाय नव्हे तर एकात्मिक दृष्टिकोनातून झाला पाहिजे. रिअल इस्टेट, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पर्यावरण आणि सामाजिक सलोखा हे वेगवेगळे विषय नसून ते एकाच विकासचक्राचे भाग आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात उत्तम शाळा, आरोग्य सेवा, सुरक्षित वातावरण, सार्वजनिक जागा, स्वच्छ हवा आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी प्रत्येकाची आहे, छत्रपती संभाजीनगर राहण्यायोग्य तर असावे, सोबत ते आनंददायी बनावे, असे मत बांधकाम क्षेत्रातील उद्योजक तथा क्रेडाई नॅशनलचे राष्ट्रीय सहसचिव प्रमोद खैरनार यांनी व्यक्त केले. ---- छत्रपती संभाजीनगर शहराचा आता चारही दिशेला विस्तार होत आहे. वाळूज, शेंद्रा औद्योगिक वसाहतीनंतर आता डीएमआयसी-बिडकीन परिसरातील नवे औद्योगिक क्षेत्र आणि त्यांचा विकास हा शहराच्या विस्ताराला पूरक ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर शहराने आता नवे रूप धारण करण्यास सुरवात केलेली आहे. या शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. शहराच्या विविध भागांत टोलेजंग, बहुमजली इमारती लक्ष वेधून घेत आहेत. अर्थात शहराचा विकास केवळ रस्ते, पाणी, पूल आणि उंच इमारतींपुरता मर्यादित नसून शहर राहण्योग्य (लिव्हेबल) आणि आनंददायी (लव्हेबल) बनविणे ही सामूहिक जबाबदारी आहे. शहरातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक संस्था, माध्यमे आणि नागरिक यांनी एका दिशेने काम केल्यास छत्रपती संभाजीनगर देशातील आदर्श शहर होऊ शकते, असे प्रमोद खैरनार यांनी नमूद केले. जलसंधारणाबाबत व्हावा विचार विकसित छत्रपती संभाजीनगर शहराला पाण्याबाबत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता हा मुद्दा मार्गी लागला पाहिजे. जटवाडा, सातारा आणि शेंद्रा या पाणलोट क्षेत्रांमध्ये नियोजनबद्ध काम झाल्यास मोठ्या प्रमाणावर पाणी साठवता येऊ शकते. जर या शहरात येणाऱ्या या तीन पाणलोट क्षेत्रांतील पाणी अडवले, जिरवले व वापरले तर दरवर्षी पैठणच्या नाथसागर प्रकल्पातून पाणी उचलून आणण्यासाठी लागणारे वीजबिलाचे शेकडो कोटी रुपये वाचतील व तो निधी इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी वापरता येईल, असे खैरनार यांना वाटते. शिरपूर पद्धतीचे बंधारे, नाले रुंदीकरण आणि जलसंधारणाच्या कामांमुळे काही गावांमध्ये विहिरी वर्षभर पाणीसाठा राहिला असून शेतीला त्याचा फायदा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि महानगर विकास प्राधिकरणाने एकत्र बसून शहरासाठी जलसंधारणाचा आराखडा तयार केला पाहिजे, अशी अपेक्षा प्रमोद खैरनार व्यक्त करतात. जलसंंधारण, जलसंवर्धनाचा सर्व व्यापक विचार हा शहराच्या अधिक शाश्वत विकासाला पूरक ठरू शकतो. ‘फाइव्ह एच’च्या आधारे शहराची ओळख छत्रपती संभाजीनगर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘५ एच’ महत्त्वाचे आहेत. यात हेरिटेज, हाउसिंग, हार्मनी, ह्युमन डेव्हलपमेंट आणि हाय-व्हॅल्यू इंडस्ट्री यांचा समावेश आहे. शहराचा ऐतिहासिक वारसा, पर्यटनस्थळे, औद्योगिक क्षमता आणि शैक्षणिक सुविधा यांचा एकत्रित विकास केल्यास शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होईल. स्मार्ट सिटी म्हणजे केवळ निधी खर्च करून उभारलेली यंत्रणा नव्हे. नागरिकांची शिस्त, प्रशासनातील पारदर्शकता आणि डिजिटल सुविधा यामुळेच शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होते. बांधकाम परवानगी, वाहतूक व्यवस्थापन, पाणीपुरवठा, मालमत्ता नोंदी, कचरा व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवा या सर्व क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करावा, असेही प्रमोद खैरनार यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र जागतिक ब्रँड तयार करावा जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळ, वारसा स्थळांमुळे छत्रपती संभाजीनगराची वेगळी ओळख आहे. आता भविष्यात छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचा विचार करताना मेलबर्न, सिंगापूर, दुबई, बंगळुरू आणि पुणे या शहरांच्या अनुभवातून योग्य धडे घेण्याची गरज आहे. मेलबर्नने दर्जेदार जीवनमानाला प्राधान्य देत नियोजन, शिस्त आणि देखभालीवर भर दिला. सिंगापूरने पायाभूत सुविधांसोबत स्वच्छता, शिस्त आणि दीर्घकालीन नियोजनाची सांगड घातली. दुबईने स्वतःची जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी विकासाला ब्रँडिंगची जोड दिली. दुसरीकडे बंगळुरू आणि पुण्याच्या अनुभवातून उद्योग आधी आणून नंतर पायाभूत सुविधा उभारण्याच्या मर्यादा स्पष्ट होतात. त्यामुळे शहरासाठी ‘पहिले नियोजन, मग विस्तार’ हा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. वाहतूक, पाणी, रस्ते, सार्वजनिक सुविधा, पर्यावरण आणि रोजगार यांचा समन्वय साधून छत्रपती संभाजीनगरनेही स्वतंत्र जागतिक ब्रँड तयार केला पाहिजे, असे प्रमोद खैरनार यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिक ‘सिटी ॲम्बेसेडर’ छत्रपती संभाजीनगरातील विकासाच्या घोडदौडीमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असला पाहिजे. सध्याची वाटचाल पाहता छत्रपती संभाजीनगरसाठी ‘वर्ष २०५० चे एकात्मिक नियोजन’ आवश्यक आहे. विविध संघटना, राजकीय नेते, उद्योजक, माध्यमे, प्रशासन आणि नागरिक यांनी आता स्पर्धेपेक्षा सहकार्याची भूमिका स्वीकारावी. छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा संस्थेचा विषय नाही. तो सर्वांचा आहे. आता प्रत्येक नागरिक शहराचा ‘सिटी ॲम्बेसेडर’ आहे. ‘शहराचा धर्म म्हणजे विकास आणि शहराचे भविष्य एकच असते’, असे खैरनार यांनी नमूद केले. -----/////----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com