‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
--
शिवरायांच्या पराक्रमाचा जागर; दुष्काळग्रस्तांना मदतीचा संकल्प
---
छत्रपती संभाजीनगर, ता. २७ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, स्वराज्य स्थापनेच्या संघर्षाची आणि मावळ्यांच्या बलिदानाची गाथा उलगडणाऱ्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या भव्य ऐतिहासिक सातदिवसीय महानाट्याला जाबिंदा मैदानावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देवेंद्र सेवा महोत्सवांतर्गत सोमवारी (ता. २६) या महानाट्याचा पहिला प्रयोग सादर झाला. मंगळवारी (ता. २७) दुसऱ्या दिवशीही महानाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली.
बीड बायपासवरील जाबिंदा मैदानात होत असलेल्या या महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जीवनप्रवास, स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टी, गनिमी काव्याचे सामर्थ्य आणि मावळ्यांची स्वामिनिष्ठा रंगमंचावर उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतिहासातील महत्त्वाचे प्रसंग नाट्यमय स्वरूपात अनुभवण्याची संधी मिळत असल्याने इतिहासप्रेमी, शिवभक्त आणि तरुणांमध्ये या उपक्रमाबद्दल उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित देवेंद्र सेवा महोत्सवाचा हा प्रमुख उपक्रम आहे. या आयोजनाला सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात आली आहे. महानाट्याचे प्रयोग रोज सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत होणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
--
सामाजिक कार्याची जोड
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र सेवा महोत्सवाच्या माध्यमातून मदतीचे उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. एक हजार ग्रामपंचायतींना पशुधनासाठी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देणे आणि ५०० महिलांना शिलाई यंत्रांचे वाटप करणे, असे नियोजन आयोजकांनी जाहीर केले आहे. ग्रामीण भागातील पशुपालकांना पाणीटंचाईच्या काळात दिलासा मिळावा आणि महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. देवेंद्र सेवा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी शिवरायांच्या विचारांना सामाजिक कृतीची जोड देण्याचा या उपक्रमाचा हेतू असल्याचे सांगितले आहे.