((इन्फोग्राफिक्स))
PNE26W65666- लोगो
-----------
सावधान! तुम्ही प्री-डायबेटिक तर नाही ना?
---------
नेहमीपेक्षा जास्त तहान लागणे आणि तोंड कोरडे पडणे, विशेषतः रात्री लघवीसाठी वारंवार उठावे लागणे, कोणताही विशेष आहार किंवा व्यायाम न करता शरीराचे वजन झपाट्याने घटणे, पुरेशी झोप घेऊनही दिवसभर निरुत्साही आणि थकल्यासारखे वाटत असेल तर वेळीच सावध व्हा! कारण, ही लक्षणे प्री-डायबेटिकचे (मधुमेह होण्याच्या उंबरठ्यावर) आहेत. याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केले, तर मधुमेह होऊन आयुष्यभराचे दुखणे सोबत राहील. यामुळे वरील लक्षणे दिसत असल्यास वेळीच सावध होऊन उपाययोजना करा. जेणे करून त्यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे मधुमेहाचे युवा पिढीत वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचेही निरीक्षण नोंदविले गेले आहे.
--------
ही आहेत कारणे
आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ आणि जागतिक आरोग्य संघटनेने २०२६ आणि २०२७ या दोन वर्षांसाठी जनजागृतीवर आधारित संकल्पना निश्चित केली आहे. धावपळीच्या युगात बदलती जीवनशैली, बैठी कामे, जंकफूडचे अतिसेवन, वाढते वजन, मानसिक ताणतणाव आणि व्यायामाच्या अभावामुळे मधुमेहाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. पूर्वी चाळिशीनंतर आढळणारा हा आजार आता विकसनशील शहरांमध्येही ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये झपाट्याने वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
------
आलेख वाढता...
जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील मधुमेहाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. जगात सध्या ५८ कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जवळपास निम्म्या अर्थात सुमारे ४५ ते ५० टक्के रुग्णांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहीतच नाही. भारतात सध्या १० कोटींहून अधिक नागरिक मधुमेहाचे रुग्ण आहेत, तर तब्बल १३ कोटींहून अधिक लोक ‘प्री-डायबेटिक’ अर्थात मधुमेह होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, शहरी भागांसोबत निमशहरी भागातही रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. २०५० पर्यंत जगातील मधुमेही रुग्णांची संख्या ८५ कोटींपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तविला आहे. हे संकट रोखण्यासाठी २०३० पर्यंत जगातील किमान ८० टक्के मधुमेही रुग्णांचे निदान व्हावे आणि निदान झालेल्या रुग्णांची रक्तातील साखर व रक्तदाब नियंत्रणात राहावा, असे उद्दिष्ट ठेवले आहे.
-------
प्राथमिक लक्षणे कशी ओळखावीत?
- सुरवातीची लक्षणे अनेकदा सौम्य असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यावे.
- शरीरावर झालेली छोटी जखम किंवा खरचटलेले भाग भरून येण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणे.
- डोळ्यांसमोर धूसर दिसणे किंवा वाचनास त्रास होणे.
- वारंवार त्वचा किंवा मूत्रमार्गाचे संसर्ग होणे, हाता-पायांना मुंग्या येणे.
- वारंवार लघवी होणे
- शरीराचे वजन झपाट्याने घटणे
------
प्री-डायबेटिक असाल, तर अशी घ्या काळजी
- प्री-डायबेटिक अवस्थेत योग्य पावले उचलल्यास मधुमेह पूर्णपणे टाळता येतो.
- रोज किमान ३० ते ४५ मिनिटे वेगाने चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा योगासने करावीत.
- आठवड्यातून किमान १५० मिनिटे शारीरिक हालचाल आवश्यक आहे.
- साखर, गोड पदार्थ, मैदा, बेकरी उत्पादने आणि अतितेलकट किंवा तळलेले पदार्थ टाळावेत.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, सलाड, सुका मेवा आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांचा समावेश करावा.
- शरीराचे वजन पाच ते सात टक्क्यांनी कमी केले, तरी मधुमेह होण्याचा धोका निम्म्याने कमी होतो.
- रोज सात ते आठ तासांची शांत झोप घ्यावी. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान-धारणा करावी.
- वर्षातून किमान एकदा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तातील साखरेची तपासणी करावी.
-------
दुर्लक्षाने गंभीर परिणाम
लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रक्तातील वाढलेली साखर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करू शकते. निदान होईपर्यंत अनेक रुग्णांचे डोळे (डायबेटिक रेटिनोपॅथी), मूत्रपिंड विकार, हृदयविकार आणि पायांच्या नसांवर गंभीर परिणाम झालेला असतो. ज्यांना आधीच मधुमेहाचे निदान झाले आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नये. नियमित औषधे घ्यावीत आणि पायांना जखम होणार नाही, याची काळजी घ्यावी. मधुमेह हा असाध्य आजार नसून, योग्य जीवनशैली आणि वेळेवर केलेल्या कृतीमुळे तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
--------
((कोट))
नागरिकांनी रोज नियमित व्यायाम करावा, गोड खाण्यावर नियंत्रण ठेवावे. दारू, तंबाखू व्यसनापासून दूर राहा. नियमित प्राणायाम करून मानसिक आरोग्य योग्य ठेवा, रागावर नियंत्रण ठेवावे. नियमित तपासणी करावी. गरज असेल तर उपचार करून घ्या.
-डॉ. गोविंद बिलापट्टे, तालुका आरोग्य अधिकारी, शिरूर अनंतपाळ
-------------
संकलन- विकास व्होरकटे