(दोन कॉलम)
--
फोटो ः प्रीपेड मीटर
---
सण-उत्सवासाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बंधनकारक
‘आकडा’ टाकणे पडणार महागात, तात्पुरती वीजजोडणी देणार
---
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, अन्य सार्वजनिक धार्मिक उत्सवांच्या काळात मंडप, रोषणाई, सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर केला जातो. मात्र, वीजवाहिनीवर थेट आकडा टाकून अथवा अनधिकृत वायरिंग करून वीज वापरणाऱ्या उत्सव मंडळांना यंदा चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. महावितरणने सार्वजनिक धार्मिक उत्सवांसाठी दिल्या जाणाऱ्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी यंदापासून प्रीपेड स्मार्ट मीटर बंधनकारक केले आहे.
यामुळे उत्सव मंडळांना मोबाइल रिचार्जच्या धर्तीवर आधी रक्कम भरावी लागणार असून, उपलब्ध शिल्लकीनुसारच वीज वापरता येणार आहे. शिल्लक रक्कम संपत आल्यास पुन्हा रिचार्ज करून वीजपुरवठा सुरू ठेवता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठी मंडळांना तात्पुरती वीजजोडणी उपलब्ध करून दिली जाते. या जोडणीसाठी घरगुती वीजदरानुसार आकारणीची सवलत उपलब्ध असल्याने मंडळांनी अनधिकृत वीज वापरण्यापेक्षा अधिकृत जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. अधिकृत वीजजोडणीमुळे केवळ वीजचोरीला आळा बसणार नाही, तर मंडपातील विद्युत दुर्घटनांचा धोकाही कमी होणार आहे. मंडळांनी वीजभाराची योग्य माहिती देऊन आवश्यक क्षमतेची जोडणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तात्पुरत्या जोडणीसाठी बसविण्यात येणाऱ्या प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये मंडळाला अपेक्षित वीजवापरानुसार आधी रक्कम जमा करावी लागेल. त्यानंतर वापरलेल्या विजेचे शुल्क मीटरमधील उपलब्ध शिल्लकीतून वजा होत जाईल. शिल्लक कमी झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पुन्हा रिचार्ज करता येईल. वीजवाहिनीवर आकडा टाकणे किंवा परवानगीशिवाय वीज घेणे हा केवळ नियमभंग नसून कायद्याने गुन्हा आहे.
---
मंडपातील सुरक्षेकडे दुर्लक्ष नको
मंडपातील विद्युत व्यवस्था उभारताना अर्थिंग, एमसीबी, वायर, प्लग, इतर विद्युत उपकरणांची तपासणी अधिकृत विद्युत कंत्राटदाराकडून करून घेणे आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्युत भार घेणे, निकृष्ट दर्जाच्या वायरचा वापर करणे किंवा उघडे विद्युत जोड ठेवणे टाळावे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
---
छोटी चूक ठरू शकते जीवघेणी
वीजवाहिनीवर आकडा टाकणे, अनधिकृत वायरिंग करणे किंवा असुरक्षित पद्धतीने विद्युत उपकरणे जोडल्याने शॉर्टसर्किट, आग लागणे तसेच विजेचा धक्का बसण्याचा धोका वाढतो. उत्सवाच्या काळात मंडपात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने अशा दुर्घटनेचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
---
मंडप उभारताना ‘हे’ अंतर ठेवा
वीजवाहिनी, विद्युत खांब, रोहित्राच्या अगदी जवळ मंडप उभारू नये.
मंडपाचा लोखंडी सांगाडा वीजवाहिन्यांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. झेंडे, बॅनर, पताका आणि सजावटीचे साहित्य विद्युत तारांपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे. वायरिंगमध्ये उघडे जोड ठेवू नयेत. क्षमतेपेक्षा अधिक विद्युत भार घेऊ नये. विद्युत उपकरणे आणि वायरिंगची तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. अनधिकृतपणे वीजवाहिनीवर आकडा टाकू नये. मंडळांसाठी महावितरणचा स्पष्ट संदेश उत्सव काही दिवसांचा; पण चुकीच्या विद्युत जोडणीचा परिणाम आयुष्यभराचा ठरू शकतो. त्यामुळे रोषणाईसाठी अधिकृत वीजजोडणी घ्या आणि सुरक्षित उत्सव साजरा करा.
----
मंडळांनी काय लक्षात ठेवावे
प्रीपेड स्मार्ट मीटर कसे चालेल?
-मोबाइल रिचार्जप्रमाणे आधी रक्कम जमा करावी लागेल. मीटरमधील उपलब्ध शिल्लकीतून वापरलेल्या विजेचे शुल्क वजा होत जाईल.
शिल्लक संपली तर?
-वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी पुन्हा रिचार्ज करता येईल.
अधिकृत जोडणीचा फायदा काय?
-वीजचोरीवरील कारवाईचा धोका टाळता येतो. त्याचबरोबर मंडपातील असुरक्षित वायरिंगमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यास मदत होते.
वीजदरात सवलत का?
-सार्वजनिक धार्मिक उत्सवांसाठीच्या तात्पुरत्या अधिकृत वीजजोडणीसाठी घरगुती वीजदरानुसार आकारणीची सवलत उपलब्ध आहे.
मंडळांनी काय टाळावे?
-वीजवाहिनीवर आकडा टाकणे, उघडे वायरिंग ठेवणे, क्षमतेपेक्षा अधिक भार घेणे आणि विद्युत तारांजवळ मंडप उभारणे टाळावे.
----------