पिण्याच्या पाण्याला प्राधान्य : जिल्हाधिकारी
नांदेड, ता. ६ : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पैनगंगा प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. नदीपात्रातून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखून संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
यासंदर्भात नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. पाटबंधारे आणि महावितरण विभागाने नदीपात्रातील पाणी उपशाची दररोज पाहणी करावी. अनधिकृत मोटारपंप आणि विद्युत जोडण्या जप्त कराव्यात. गरजेनुसार संबंधित भागातील विद्युत रोहित्र (डीपी) बंद करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. नदीकाठच्या गावांतील पोलिस पाटील, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी नियमित पाहणी करून अनधिकृत पाणी उपशाची माहिती संबंधित विभागांना द्यावी, असेही सांगण्यात आले.
यंदा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्याने त्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करावी. उसासारखी अधिक पाणी लागणारी पिके घेणे टाळावे, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षण आणि चार आवर्तनांना परवानगी असली, तरी पाण्याचा अनधिकृत उपसा अथवा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.