ढगाळ हवामानामुळे तुरीवर किडींचे सावट
हिंगोली, ता. ९ (बातमीदार) : जिल्ह्यात तुरीचे पीक सध्या फुलोऱ्यातून शेंगा धरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात असतानाच बदलत्या हवामानामुळे पिकावर किडींचे संकट घोंगावत आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, कोरडी हवा आणि रात्रीच्या वेळी जाणवणारी थंडी यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळ्या, पिसारी पतंग आणि शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऐन भरात आलेल्या पिकावर कीड पडल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत असल्याने तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतात नियमित निरीक्षण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. किडींचा प्रादुर्भाव सुरवातीलाच रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार, किडींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रतिहेक्टरी २० पक्षी थांबे आणि २० कामगंध सापळे उभारावेत. सापळ्यांमध्ये सलग २ ते ३ दिवसांत ५ ते ६ पतंग आढळल्यास किंवा झाडावर एखादी अळी दिसताच तत्काळ नियंत्रण उपायांना सुरवात करावी. पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना शिफारशीत निंबोळी अर्क अथवा जैविक कीटकनाशकांची पहिली फवारणी करावी. यानंतर १५ दिवसांनी पिकाची फेरपाहणी करून गरजेनुसार शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.