वैद्यकीय महाविद्यालये वाढली, पण दर्जेदार शिक्षकांचे काय? ः डॉ. सतीश रोपळेकर
पहिला इंट्रो
डॉ. सतीश रोपळेकर हे आरोग्य क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवी आणि नामवंत ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, रुग्णांना उत्तम आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचे त्यांचे ध्येय आहे. वैद्यकीय व्यवसाय करताना त्यांनी रुग्णांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत, तसेच डॉक्टरांना येणाऱ्या अडचणींचाही त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.
-----
दुसरा इंट्रो
राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढत असली तरी त्या प्रमाणात तज्ज्ञ शिक्षकांची मोठी कमतरता प्रामुख्याने जाणवत आहे. या महत्त्वाच्या लेखात निवासी डॉक्टरांवर पडणारा अतिरिक्त कामाचा प्रचंड ताण, अपुरी विश्रांती आणि त्यामुळे डॉक्टर व रुग्ण यांच्या नात्यात निर्माण होणारा दुरावा यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. कॉर्पोरेट रुग्णालयांच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक नर्सिंग होम कसे लोप पावत आहेत, याचेही विदारक वास्तव यात मांडले आहे. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अनेक सकारात्मक बदल करण्याची नितांत गरज यातून स्पष्ट होते.
----
राज्यभरात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्या प्रमाणात प्राध्यापक आणि तज्ज्ञ शिक्षकांची उपलब्धता वाढविण्याचे नियोजन शासनाकडे दिसत नाही. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा टिकवायचा असेल तर शिक्षकांच्या निवृत्तीचे वय वाढविणे, पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा वाढविणे आणि ग्रामीण सेवेसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सतीश रोपळेकर यांनी व्यक्त केले.
डॉक्टरांवरील वाढता ताण, डॉक्टर-रुग्ण नात्यातील दुरावा, वैद्यकीय शिक्षणातील आव्हाने, विमा कंपन्यांचे वाढते वर्चस्व आणि बदलत्या आरोग्य व्यवस्थेतील धोरणात्मक प्रश्नांवर त्यांनी परखडपणे भूमिका मांडली. ते म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर ३६-३६ तास सलग काम करतात. अशा परिस्थितीत त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमता प्रभावित होणे स्वाभाविक आहे. मात्र, एखादी दुर्दैवी घटना घडली की डॉक्टरांनाच लक्ष्य केले जाते. डॉक्टरांवरील हल्ले, रुग्णालयांतील तोडफोड आणि दबावतंत्र यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास कमकुवत होत आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते पूर्वीसारखे राहिलेले नाही. वाढता कामाचा ताण आणि वेळेची कमतरता यामुळे डॉक्टरांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी सविस्तर संवाद साधता येत नाही. त्यामुळे गैरसमज वाढतात. रुग्णांचे अधिकार जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच डॉक्टरांचेही अधिकार आहेत. दोघांनी एकमेकांना समजून घ्यावे, असेही ते म्हणाले.
संमतीपत्र ही केवळ सही घेण्याची किंवा धोके सांगण्याची प्रक्रिया नसून, रुग्णाला उपचारांचे फायदे, धोके, पर्याय आणि परिणाम समजावून सांगणे ही डॉक्टरांची नैतिक जबाबदारी आहे. पारदर्शक संवादामुळेच रुग्णांचा विश्वास व आत्मीयता वाढते. तसेच पारदर्शकतेतून तणावही कमी होतो, असेही त्यांनी नमूद केले.
शारीरिक, मानसिक थकवा वाढल्याने डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना घडली, की नातेवाइकांकडून संताप व्यक्त होतो. हिंसाचार होतो आणि डॉक्टर असुरक्षित बनतात. त्यावेळी समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन जाब विचारला पाहिजे. जरी डॉक्टरांची चूक गृहीत धरली, तरी त्यांना शिक्षा करण्यासाठी कायदा आहे. तो इतरांनी हातात का घ्यावा, असा सवाल डॉ. रोपळेकर यांनी केला. वर्क-लाइफ बॅलन्स हा केवळ इतर व्यवसायांसाठी नाही, तर डॉक्टरांसाठीही तितकाच आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
----
आता मुंबई-पुणे जावे लागत नाही...
आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती झाली. छत्रपती संभाजीनगरातील आरोग्य सुविधा आता महानगरांच्या तोडीस तोड झाल्या. पूर्वी हृदयविकाराच्या उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई गाठावी लागत होती. आता अत्याधुनिक अँजिओप्लास्टी, हृदय शस्त्रक्रिया आणि इतर प्रगत उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली. नियमित तपासण्या, औषधोपचारांचे पालन आणि निरोगी जीवनशैलीकडे कल वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
-----
नर्सिंग होम लोप पावत आहेत
कॉर्पोरेट आरोग्य व्यवस्थेच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक नर्सिंग होमची संख्या झपाट्याने कमी झाल्याची खंतही डॉ. रोपळेकर यांनी व्यक्त केली. वर्ष १९९० च्या दशकात शहरात मोठ्या प्रमाणात असलेली छोटी रुग्णालये आता जवळपास नामशेष झाली. वाढत्या नियमावली, परवानग्या, सुरक्षेच्या अटी आणि खर्चामुळे लहान रुग्णालये टिकवणे अवघड झाले. याचा परिणाम रुग्णांच्या उपचार खर्चात वाढ होण्यात होत असल्याचे डॉ. रोपळेकर म्हणाले.
भविष्यात आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ आणि लोकाभिमुख करण्यासाठी समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गुंतागुंतीच्या आजारांवर सहज आणि यशस्वी उपचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास धोके नक्कीच टाळता येऊ शकतात. डॉक्टर रात्रंदिवस रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आपले शंभर टक्के योगदान देत असतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याविषयी कायम कृतज्ञतेची आणि सहकार्याची भावना मनात बाळगली पाहिजे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीला उत्तम मार्गदर्शन मिळाले, तर उद्याचे निष्णात डॉक्टर या समाजाला उपलब्ध होतील. प्रशासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणखी सक्षम केल्यास शहरी रुग्णालयांवरील अतिरिक्त ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. तसेच, लहान पारंपरिक नर्सिंग होमला शासनाने योग्य ती मदत आणि प्रोत्साहन दिले, तर सर्वसामान्य रुग्णांना अतिशय वाजवी दरात दर्जेदार उपचार मिळणे सहज शक्य होईल. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचा सेतू जितका अधिक भक्कम होईल, तितकीच आपली आरोग्य व्यवस्था खऱ्या अर्थाने यशस्वी, प्रगत आणि रुग्णांच्या सर्वांगीण हिताची ठरेल, यात कोणतीही शंका नाही.
-----
हे व्हावे...
डॉक्टरांनाही वर्क-लाइफ बॅलन्सची गरज
ग्रामीण भागात डॉक्टरांना आकर्षित करणारी प्रोत्साहने हवीत
विमा कंपन्यांनी उपचारपद्धतींवर वर्चस्व गाजवू नये
भविष्यातील आरोग्य व्यवस्था आणि सकारात्मक दृष्टिकोन
-----