पाण्याअभावी रब्बीची आशाही मावळली
----
जळकोट तालुक्यातील चित्र, परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याचा परिणाम
जळकोट,ता.२९ : तालुक्यात यंदा खरीप हंगाम पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर परतीचा पाऊस येईल आणि रब्बी हंगामात पेरणी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र विविध भागात केवळ ढग दाटत आहेत, पाऊस पडत नसल्याने आता रब्बीची आशा मावळल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. एकीकडे साठवण तलावात असलेला जलसाठा प्रशासनाने आरक्षित केला आहे तर दुसरीकडे विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी घसरली आहे. त्यामुळे रब्बी पेरणी होणार कशी हा प्रश्न आहे. तर उन्हाच्या तडाख्याने जमिनीतील ओलावा कमी झाल्याने कपाशी आणि तूर पिकांची वाढ खुंटत ती होरपळून गेली आहेत. काही ठिकाणी कपाशीच्या झाडांना केवळ चार ते पाच बोंडे लागल्याचे शेतकरी सांगत आहेत. तुरीच्या पिकालाही पाण्याचा ताण बसत असून, काही ठिकाणी झाडे सुकू लावली आहेत. अशा स्थितीत आता रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर अल्प प्रमाणात पेरणी केली आहे. खरीप पिकांचे नुकसान आणि रब्बी हंगामातील पाणीटंचाई, अशा दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि कृषी विभागाने पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून आवश्यक मदतीबाबत निर्णय घ्यावा, तसेच रब्बी हंगामासाठी पाणी नियोजन आणि टंचाईवरील उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
-----